मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 डिसेंबर 2025
मुंबई, – शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह वाढत्या लोकसंख्या पाहता मुंबई शहरात चार पोलीस ठाण्यांसह दोन पोलीस उपायुक्त परिमंडळ आणि तीन सहाय्यक पोलीस आयुक्त विभागाला गृहविभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. लवकरच मुंबई पोलीस दलात महाराष्ट्र नगर, गोळीबार, असल्फा नावाच्या चार पोलीस ठाण्याची भर पडणार आहे. या चार पोलीस ठाण्यासाठी 1 हजार 448 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 124 कोटी 13 लाख 53 लाख 208 रुपयांची तर दोन परिमंडळ व तीन सहाय्यक पोलीस आयुक्त विभागासाठी 7 कोटी 39 लाख 84 हजार इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई शहरातील वाढती गुन्हेगारी आणि लोकसंख्या तसेच कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन आणखीन पोलीस ठाण्याची गरज असल्याचे मत वरिष्ठांकडून मांडण्यात आले होते. तसा प्रस्ताव गृहविभागाला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची गृहविभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. अखेर मुंबई शहरात चार पोलीस ठाण्यांसह दोन परिमंडळ आणि तीन सहाय्यक पोलीस आयुक्त विभागाला गृहविभागाने मान्यता दिली आहे.
मालवणी आणि घाटकोपर पोलीस ठाण्याचे विभाजन करुन अनुक्रमे मढ मार्वे आणि असल्फा पोलीस ठाणे, वाकोला आणि निर्मलनगर तसेच भांडुप व कांजूरमार्ग पोलीस ठाण्यातील काही विभागाची विभागणी करुन अनुक्रमे गोळीबार आणि महाराष्ट्र नगर पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या चारही पोलीस ठाण्यासाठी 1 हजार 448 नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी प्रत्येकी 362 पोलीस निरीक्षक ते पोलीस शिपाई पदांचा समावेश असणार आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वच्छतेसाठी आऊटसोर्सिंग केले जाणार आहे. त्यासाठी 124.13 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई शहरात सध्या तेरा परिमंडळ असून त्याची पुर्नरचना करुन त्यात आणखीन दोन परिमंडळासह तीन सहाय्यक पोलीस आयुक्त विभागाला मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी अनुक्रमे 34 व 30 पदे मंजूर करण्यात आली आहे.
दोन पोलीस उपायुक्त, तीन सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक ते पोलीस हवालदार, चालक आदी पदासाठी 6.24 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. गृहविभागाचे उपसचिव आ. टी भालवणे यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.