मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – मालवणी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. फेरीवाल्याकडून हप्तावसुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित चारही पोलिसांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत ते चौघेही दोषी असल्याचे आढळून आले. या चौघांमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रदीप निवृत्ती कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय तुकाराम रासकर, पोलीस शिपाई विकास साहेबराव माळी, पोलीस शिपाई चालक महेंद्रकुमार रामराव मराळ यांचा समावेश आहे. शुक्रवार 3 सप्टेंबरला संबंधित चारही पोलिसांनी निलंबनाची नोटीस स्विकारली आहे.
16 सप्टेंबर 2025 रोजी मालाडच्या मालवणी परिसरातील एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यात मालवणी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फेरीवाल्यांकडून हप्ता घेत असल्याचे दिसून आले होते. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. या व्हिडीओची शहानिशा केल्यानंतर संबंधित पोलिसांनी हप्ता वसुली केल्याचे उघडकीस आले होते.
या व्हिडीओमुळे पोलीस दलाची बदनामी झाली होती. बदनामीसह सर्वसमान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रासकर, पोलीस शिपाई विकास माळी आणि पोलीस शिपाई चालक महेंद्रकुमार मराळ यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली होती.
अखेर या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाची नोटीस 27 सप्टेंबरला संबंधित् पोलिसांनी स्विकारली आहे. एकाच वेळेस मालवणी पोलीस ठाण्यात चार पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.