मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मार्च 2025
मुंबई, – शहरात गेल्या दोन दिवसांत चार विविध घटनेत चार अल्पवयीन मुलींवर त्यांच्या परिचित आरोपींनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चारही घटना विक्रोळी, खार, वरळी आणि जोगेश्वरी परिसरात घडल्या. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चार स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन चारही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
विक्रोळी येथे एका पाच वर्षांच्या मुलीवर तिच्याच परिचित 50 वर्षांच्या आरोपीने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच नरोत्तम नावाच्या आरोपीस विक्रोळी पोलिसांनी अटक केली. पाच वर्षांची ही मुलगी तिच्या पालकांसोबत विक्रोळी परिसरात राहते. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही मुलगी घरासमोर खेळत होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिच्या गुप्त भागांवर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने विक्रोळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. पिडीत मुलगी व आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहे. आरोपीचा ताडपत्री विक्रीचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसर्या घटनेत वांद्रे येथे एका नऊ वर्षांच्या मुलीवर अशाच प्रकारे लैगिंक अत्याचार झाला होता. ही मुलगी खार पूर्वेला राहते. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता ती तिच्या घराजवळ असताना तिथे शिलाई काम करणारा रवी नावाचा 32 वर्षांचा आरोपी आला. त्याने तिच्याशी जवळीक तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यात तिच्या गुप्त भागाला दुखापत झाली होती. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. ते दोघेही एकाच परिसरात असून त्यांची तोंडओळख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जोगेश्वरी येथे एका सोळा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना घडली. याप्रकरणी राहुल नावाच्या एका 20 वर्षांच्या आरोपीविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा जोगेश्वरीच्या हद्दीत घडला होता, त्यामुळे त्याचा तपास मेघवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. सोळा वर्षांची ही मुलगी जोगेश्वरी येथे राहते. गुरुवारी 13 मार्चला सायंकाळी साडेसात वाजता ती रस्त्यावरुन जात होती. यावेळी तिथे राहुल आला आणि त्याने तिला कॅडबरी देण्याचा बहाणा करुन एका निर्जनस्थळी नेले. तिथेच त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या घटनेनंतर तो पळून गेला होता. घडलेला प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार केली होती. अटकेनंतर या तिन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरळी येथे आईच्या प्रियकराकडून लैगिंक अत्याचार
वरळी येथील अन्य एका घटनेत आईच्या प्रियकरानेच पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केला. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार करत होता. ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. 22 वर्षांची तक्रारदार तरुणी ही जुहू येथे राहत असून पंधरा वर्षांची पिडीत तिची लहान बहिणी आहे. सध्या ती दहावीत शिकत असून तिची परिक्षा सुरु आहे. पप्पू नावाचा 45 वर्षांचा आरोपी त्यांच्या आईचा प्रियकर असून अनेकदा तो त्यांच्याकडे राहत होता. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पिडीत मुलीला सतत उलट्या होत होत्या. तिला मासिक पाळी आली नव्हती. त्यामुळे तिने तिला मेडीकलमधून प्रेग्नेनशी किट घेऊन तपासणी करण्यास सांगितले. त्यामुळे तिने ते किट आणून घरीच तपासणी केली होती. त्यात तिला ती गरोदर असल्याचे समजले. चौकशीनंतर पिडीत मुलीने आरोपी तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून लैगिंक अत्याचार करत होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस म्हणून तो तिला धमकावत होता. त्यामुळे भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिच्या बहिणीने वरळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.