मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – अंधाराचा फायदा घेऊन रॉबरीसाठी मालवणी परिसरात आलेल्या चार रेकॉर्डवरील गुन्हेगारांना रॉबरीपूर्वीच मालवणी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. अरसलान ऊर्फ आरशान ऊर्फ असफान एहसान कुरेशी धीरज चंद्रशेखर मिश्रा, आजम नसीमुल हसन शेख ऊर्फ फैजल आणि हानिफ मोहम्मद अन्सारअली खान अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. चारही आरोपी अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध उत्तर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
असफान आणि धीरज हे सराईत गुन्हेगार असून ते दोघेही मालाडच्या मालवणी, अंबुजवाडी परिसरात रॉबरीच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक येणारे पोलीस अंमलदार कदम, वत्रे, पठाणे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून धीरजसह असफान या दोघांनाही शिताफीने अटक केली. चौकशीत त्यांनी ते तिथे रॉबरीच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. यातील धीरजविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात अठरा, समतानगर पोलीस ठाण्यात तीन अशा एकवीस तर असफानविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात सात तर गोराई व वनराई पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. धीरजला गेल्याच महिन्यांत मुंबईसह ठाणे शहरातून एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. ही कारवाई सुरु असतानाच त्याच्या मित्रासोबत रॉबरीच्या उद्देशाने आला होता.
दुसर्या कारवाईत पोलिसांनी आजम शेख आणि हानिफ खान या दोघांना अटक केली. ते दोघेही मालाडच्या राठोडी, गावदेवी मंदिराजवळ रॉबरीच्या उद्देशाने आले होते, मात्र त्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून सराईत गुन्हेगार आहेत. यातील आजमविरुद्ध मालाड, दहिसर, मालवणी पोलीस ठाण्यात सोनसाखळी, जबरी चोरी, घरफोडी, ड्रग्जच्या पंधरा तर हानिफविरुद्ध तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याविरुद्ध ४०१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.