मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मैत्रिणीला भेटून घरी जात असताना भरस्त्यात एका फे्रंच टिचर असलेल्या तरुणीच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या 25 वर्षांच्या आरोपी तरुणाला धारावी येथून खार पोलिसांनी अटक केली. सुनिल विष्णू वाघेला असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. स्कूटीच्या क्रमांकावरुन आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगण्यात आले.
27 वर्षांची तक्रारदार तरुणी ही वांद्रे येथे राहत असून फे्रंच टिचर म्हणून काम करते. 8 नोव्हेंबरला रात्री सव्वाबारा वाजता ती खार येथील तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. मैत्रिणीला भेटून ती तिच्या घरी जाण्यासाठी पायी जात होती. यावेळी स्कूटीवरुन एक तरुण आला आणि काही कळण्यापूर्वीच त्याने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तो भरवेगात स्कूटीवरुन तेथून पळून गेला होता.
या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार खार पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी एका फुटेजमध्ये पोलिसांना स्कूटीचा क्रमांक सापडला होता.
याच क्रमांकावरुन पोलिसांनी स्कूटीच्या मालकाला शोधून काढले होते. त्याची चौकशी केलीद असता त्याने ती स्कूटी सुनिल वाघेलाला दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी धारावी परिसरातून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच तक्रारदार तरुणीचा विनयभंग करुन पलायन केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
तपासात सुनिल हा धारावीतील एमपी नगर, मरिअम्मा चाळीत राहत असून त्याचा स्वतचा व्यवसाय आहे. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.