गांजा तस्करीच्या गुन्ह्यांत दोघांना पंधरा वर्षांची सक्तमजुरी

कारावासासह दिड लाखांच्या दंडाची शिक्षा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
मुंबई, – गांजा तस्करीच्या गुन्ह्यांत अटक केलेल्या चारपैकी दोन आरोपींना विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून पंधरा वर्षांच्या सक्तमजुरीसह दिड लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. इस्माईल सलीम शेख आणि इम्रान अबरार हुसैन अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत. तीन वर्षांत या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन दोन्ही आरोपींना विशेष सेशन कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे.

23 जानेवारी 2022 रोजी कांदिवली युनिटचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी घाटकोपर परिसरात काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने घाटकोपर येथील घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, घाटकोपर बस डेपोजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे एका कारमधून आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह कारची झडती घेतल्यानंतर या कारमध्ये पोसिांना 115 किलो गांजा सापडला होता. त्यानंतर पोलिसाीं 28 लाख 75 हजार रुपयांचा 115 किलो गांजा, पाच ाखांची एक कार असा 33 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

याच कारवाईत पोलिसांनी इस्माईल शेख आणि इम्रान अन्सारी या दोघांना अटक केली होती. तपासात इस्माईल हा पवई तर इम्रान हा मुंब्रा परिसरात राहत होते. ते दोघेही तिथे गांजाची डिलीव्हरीसाठी आले होते, मात्र डिलीव्हरीपूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर 17 ऑक्टोंबर 2022 रोजी अल्ताफ मुल्का शेख आणि चक्रापाणी भल्लू गोंडा या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. यातील अल्ताफ हा व्यावसायिक असून अंधेरीतील साकिनाका तर चक्रापाणी हा मूळचा ओरिसाचा रहिवाशी असून शेतकरी म्हणून काम करत असल्याचे उघडकीस आले होते.

याच गुन्ह्यांत चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. या आरोपपत्रानंतर त्यांच्याविरुद्ध नियमित खटला सुरु झाला होता. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांची जबानी तसेच इतर पुराव्या आधारे इस्माईल शेख आणि इम्रान अन्सारी या दोघांनाही गांजा तस्करीप्रकरणी दोषी ठरविले होते. मंगळवारी कोर्टाने दोन्ही आरोपींना पंधरा वर्षांच्या कारावासासह दिड लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या गुन्ह्यांचा न्यायालयीन कामकाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक रुपेश नाईक, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खंडागळे, पोलीस हवालदार महेश चौधरी यांनी केले तर कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार सिद्धेश्वर पाटील, विल्फ्रेड मवाडो, पोलीस हवालदार भरत मोहिते यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page