विक्री केलेला गाळा त्रयस्थ व्यक्तीला विक्री करुन फसवणुक
बोरिवलीतील बिल्डरविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चौदा वर्षांपूर्वी गाळा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन विक्री केलेल्या गाळ्याची त्रयस्थ व्यक्तीला विक्री करुन एका वयोवृद्ध महिलेच्या मुलाची सुमारे ३० लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुपेंद्र प्रेमाशंकर जानी या बिल्डरविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत भुपेंद्रची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
रमाबेन जयंतकुमार मोदी ही ७२ वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला बोरिवली परिसरात राहते. तिला दोन मुले असून त्यापैकी मितेश हा सध्या अमेरिकेत नोकरी करतो तर तिचा दुसरा मुलगा तेजस हा पुण्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २००९ साली मितेशच्या पत्नीने बोरिवलीतील साई-लक्ष्मी सोसायटीमध्ये एक गाळा घेतला होता. याच गाळ्यामध्ये ती तिचे होमीओपॅथीचे क्लिनिक चालवत होती. त्यानंतर ही इमारत पुर्नविकासासाठी गेली होती. भुपेंद्र जानी याच्या जानी डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला संबंधित पुर्नविकासाचे काम देण्यात आले होते. याच दरम्यान भुपेंद्रने तेजस मोदीला त्याच्या इमारतीमध्ये एक गाळा स्वस्तात देतो असे सांगितले होते. या गाळ्याचा भविष्यात त्याला चांगला फायदा होईल असे सांगून त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याने भुपेंद्रच्या सांगण्यावरुन त्याच्या प्रोजेक्टमध्ये एक गाळा बुक केला होता. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात २३ लाख २० हजार रुपयांमध्ये तेजसला २४० स्न्वेअर फुटाचा गाळा देण्याचे नमूद करण्यात आले होते. यावेळी भुपेंद्रने त्याला आयओडी आणि सीसी मिळाल्याचे सांगून इमारतीचे सर्व प्लॅन मंजूर झाल्याचे सांगितले. लवकरच प्रोजेक्ट पूर्ण करुन त्याला गाळा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे तेजसने त्याला जानेवारी ते नोव्हेंबर २०१० या कालावधीत त्याला टप्याटप्याने तीस लाख नऊ लाख रुपये दिले होते. पेमेंट दिल्यांनतर त्यांच्यात उपनिबंधक कार्यालयात कायदेशीर करार झाला होता.
मात्र दिलेल्या मुदतीत भुपेंद्रने त्याला गाळ्याचे ऍलोटमेंट लेटर आणि ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्याला टाळणचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान मितेशला भुपेंद्रने त्याला विक्री केलेल्या गाळ्याची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन त्याच्यासोबत रजिस्ट्रेशन केल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्याने त्याला जाब विचारुन त्याच्याकडे गाळ्यासाठी घेतलेल्या पैशांची मागणी केली होती. मात्र त्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्याने गाळ्याची विक्री केल्याची कबुली देताना त्याला तुम्हाला काय करायचे ते करा. गाळ्याचा ताबा देणार नाही किंवा पैसे परत करणार नाही असे सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तेजसच्या वतीने त्याची आई रमाबेन मोदी हिने बोरिवली पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर भुपेंद्र जानीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.