टेक्सटाईल्ससह चित्रपट क्षेत्रात गुंतवणुकीच्या नावाने फसवणुक
४.८७ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ डिसेंबर २०२४
मुंबई, – टेक्सटाईल्स व्यवसायासह चित्रपट क्षेत्रात गुंतवणुकीच्या नावाने एका हॉटेल व्यावसायिकाची ४ कोटी ८७ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार गावदेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका व्यावसायिक पिता-पूत्राविरुद्ध गावदेवी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पराग जुगराज शहा आणि जुगराज शहा अशी या पिता-पूत्रांची नावे असून ते दोघेही चेंबूरचे रहिवाशी आहे. या गुन्ह्यांत ते दोघेही फरार असल्याने त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील ४३ वर्षांचे तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून ते बोमनजी पेटीट रोड, मोनालिसा अपार्टमेंटमध्ये राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांची शहा पिता-पूत्रांशी ओळख झाली होती. गावदेवीतील केम्स कॉर्नर, शिवसागर हॉटेलमध्ये त्यांची एक मिटींग झाली होती. या मिटींगमध्ये त्यांनी ते दोघेही टेक्सटाईल्स व्यावसायिक आहे. त्यांची स्वतची कंपनी आहे. व्यवसाय वाढीसाठी त्यांना त्यांच्या व्यवसायात आर्थिक गुंतवणुक करणार्या गुंतवणूकदारांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणुक करण्याची ऑफर दिली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्याकडे गेल्या दोन वर्षांत ४ कोटी ८७ लाखांची गुंतवणुक केली होती.
ही रक्कम त्यांनी टेक्सटाईल्स व्यवसायासह चित्रपट क्षेत्रात गुंतवणुक केल्याचे सांगून त्यांना गुंतवणुकीवर लवकरच चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी दिलेल्या मुदतीत त्यांना चांगला परतावा दिला नाही. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या दोघांनी व्यवसायासह चित्रपट क्षेत्रात गुंतवणुकीसाठी ४ कोटी ८७ लाख रुपये घेतले होते, मात्र ही रक्कम व्यवसायात न गुंतवणुक करता त्याचा वैयक्तिक फायद्यासााठी वापर करुन त्यांची फसवणुक केली होती. याबाबत विचारणा केल्यानंतर या दोघांनी त्यांना बघून घेण्याची धमकी देताना पेसे परत करणार नाही असे सांगतले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात जुगराज शहा आणि पराग शहा या पिता-पूत्रांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.