मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जानेवारी २०२५
मुंबई, – कोरोना काळात तोट्यात चाललेल्या व्यवसायात गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका केमिकल व्यावसायिकाची तिघांनी सहा कोटी पंधरा लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार गावदेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिन्ही व्यावसायिकाविरुद्ध गावदेवी पोलिसांनी कट रचून अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चिराग नेरीयोसंग बामबोट, तमसीन शेख आणि राकेश शिवो शेट्टी अशी या तिघांची नावे असून या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे या तिघांची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विराज विक्रम शहा हे गावदेवी परिसरात असून ते केमिकल व्यावसायिक आहे. त्यांचा मेसर्च हेवी केमिकल्स कार्पोरेशन नावाची एक पार्टनर फर्म कंपनी आहे. त्यांचे डरायस बामबोट हे मित्र असून त्यांच्यात कौटुंबिक संबंध होते. त्यांचाच चिराग हा भाऊ असून त्याचा स्वतचा व्यवसाय होता. मात्र कोरोनामुळे त्याला व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. कर्मचार्याचे वेतन, कर्जाचे हप्ते भरता येत नसल्याने चिराग हा प्रचंड मानसिक तणावात होता. त्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्याच्या कंपनीत गुंतवणुक करणारा कोणी असेल तर त्याला मदत करण्याची विनंती डरायसने विराज शहा यांच्याकडे केली होती. त्यामुळे एप्रिल २०२२ रोजी त्यांनी चिरागची भेट घेतली होती. यावेळी त्यांना चिराग हा मेकअप आर्टिस्ट असून लहान मुलांना मेकअपसंदर्भात शिक्षण देत असल्याचे समजले. या व्यवसायात प्रचंड फायदा असल्याचे सांगून त्याने त्यांना त्याच्या व्यवसायात आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने त्याच्यावर साडेतीन कोटीचे कर्ज असल्याचेही सांगितले होते. तसेच व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे असे सांगितले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना ४९ टक्के शेअर होल्डिंग पार्टनरशीप ऑफर केली होती.
ही ऑफर चांगली वाटल्याने त्यांनी चिरागच्या चिराग मॅजिकल मेकओव्हर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. मे २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत त्यांनी त्याला सुमारे साडेतीन कोटी रुपये दिले होते. ती रक्कम कोठे खर्च करायचे आहे याबाबत तो त्यांना विचारणा करत होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास बसला होता. डिसेंबर २०२२ रोजी त्याने त्यांना स्क्रिन ट्रिटमेंटचा नवीन व्यवसायासंदर्भात सांगितले होते. त्यासाठी त्याने त्यांची भेट राकेश शेट्टीशी करुन दिली होती. राकेशचा स्क्रिन ट्रिटमेंटमध्ये हातखंडा आहे. त्याच्यावर व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी असेल असे सांगून त्याने त्यांना पुन्हा त्याच्यासोबत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन काही टक्के कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. व्यवसायासाठी लागणारे मशिन, इंटेरियल, उन प्लॉटस आणि इतर कामासाठी त्यांनी काही बँका आणि वित्तीय संस्थेकडून सुमारे साडेसहा कोटीचे कर्ज घेतले होते.
कर्ज प्राप्त होताच त्यांनी फेब्रुवारी ते जुलै २०२३ या कालावधीत शिवा शेट्टी, त्याची त्याची पत्नी तमसीन शेख आणि चिराग बामबोट यांना सहा कोटी पंधरा लाख रुपये दिले होते. मात्र व्यवसाय सुरु करुनही या दोघांनी त्यांच्या कंपनीला कमिशनची रक्कम दिली नाही. विचारणा करुनही त्यांच्याकडून त्यांना काहीच माहिती देण्यात येत नव्हती. खर्चाविषयीही ते दोघेही काहीही सांगत नव्हते. अशा प्रकारे या दोघांनी तोट्यात चाललेल्या कंपनीत आर्थिक मदत करण्याची विनंती करुन, त्यांना २५ ते ४९ टक्के पार्टनरशीप तसेच कमिशन देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मेकअप आणि स्क्रिन ट्रिटमेंट व्यवसायासाठी सहा कोटी पंधरा लाख रुपये घेतले. या पैशांचा परस्पर अपहार करुन कुठलाही आर्थिक परतावा न करता त्यांची फसवणुक केली होती. या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला होता.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चिराग बामबोट, तमसीन शेख आणि राकेश शेट्टी या तिघांविरुद्ध पोलिसांनी कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या तिघांची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.