मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 फेब्रुवारी 2026
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाच्या आयुक्त पदावरील अधिकार्याच्या शासकीय फ्लॅटमध्ये घरफोडी झाल्याची घटना गावदेवी परिसरात उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन कपाटातील लॉकरमधील विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा 19 लाख 65 हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना 11 फेब्रुवारी पहाटे तीन ते 15 फेब्रुवारी रात्री नऊच्या दरम्यान गावदेवी येथील कारमायकल रोड, इन्कम टॅक्स कॉलनीत घडली. या कॉलनीतील ब्लॉक डी/2 मध्ये सुशांत कुमार हे 60 वर्षाचे वयोवृद्ध तक्रादार त्यांच्या पत्नी शोभाकुमारी आणि मुलगा अक्षतकुमार यांच्यासोबत राहतात. ते कस्टम विभागात आयुक्त पदावर काम करतात. ते राहत असलेले शासकीय फ्लॅट असून फ्लॅट तीन बेडरुमचे आहे. त्यातील मास्टर बेडरुममधील कपाटात त्यांच्या पत्नीने घरातील सर्व सोन्याचे दागिन्यासह कॅश ठेवली होती. 11 फेब्रुवारीला ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत श्रीनगर येथे फिरायला गेले होते. त्यामुळे त्यांनी सर्व दागिने आणि कॅश त्यांच्या कपाटात सुरक्षित ठेवले होते.
रविवारी 15 फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता ते सर्वजण मुंबईत आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या फ्लॅटचे कुलूप दिसले नाही. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता आतील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटातील लॉकरमधील सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले. अज्ञात व्यक्तीने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन लॉकरमधील दागिने आणि कॅश असा सर्व मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. त्यात सोन्याचा एक नेकलेस, मंगळसूत्र, मांग टिका, नथ, चार बांगड्या, दोन कानातले जोडी, दोन अंगठ्या, सोनसाखळी, ढोलना पेंडंट असा 130 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने आणि पंधरा हजाराची कॅश असा 19 लाख 65 हजाराचा मुद्देमाल होता.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गावदेवी पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुशांतकुमार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. कस्टमच्या आयुक्त पदाच्या अधिकार्याच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गावदेवी पोलिसांसह स्थानिक पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.