गावदेवी येथे जुन्या वादातून 56 वर्षांच्या व्यक्तीची हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 जुलै 2025
मुंबई, – गावदेवी येथे जुन्या वादातून अरविंद आत्माराम जाधव या 56 वर्षांच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या वेदप्रकाश कौशल मिश्रा या 28 वर्षीय आरोपीस गावदेवी पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता गावदेवी येथील कारमायकल रोड, एम. एल डहाणूकर मार्ग, मालबोरी कंपाऊंडजवळील फुटपाथवर घडली. अनिल आत्माराम जाधव हा याच परिसरातील चेअरमन बंगलो परिसरात राहत असून तो वाद्य वाजविण्याचे काम करतो. अरविंद हा त्याचा मोठा भाऊ आहे. त्याचे त्याच परिसरात राहणार्या वेदप्रकाशशी पूर्वी एका क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादामुळे त्यांच्यात सतत खटके उडत होते. सोमवारी रात्री रात्री साडेआठ वाजता मालबोरी कंपाऊंडजवळ या दोघांमध्ये जुन्या वादातून पुन्हा भांडण झाले होते. त्यातून वेदप्रकाशने अरविंद याच्यावर कोणत्या तरी जड वस्तूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर वेदप्रकाश हा पळून गेला होता.
हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक लोकांनी जखमी झालेल्या अरविंदला तातडीने नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच गावदेवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. काही प्रत्यदर्शीच्या जबानीवरुन या हत्येमागे वेदप्रकाश मिश्रा असल्याचे तसेच तो हल्ल्यानंतर पळून गेल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर अनिल जाधव याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वेदप्रकाशविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल वेदप्रकाशला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गिरगाव लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.