सोळा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करणार्या मित्राला अटक
फिरायला जाण्याचा बहाणा करुन रिसोर्टमधून आणून अत्याचार केला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – फिरायला जाण्याचा बहाणा करुन सोळा वर्षांच्या अल्पवयीन मैत्रिणीला रिसॉर्टमध्ये आणून पावसात कपडे भिजल्याचा सांगून तिला तिचे सर्व कपडे काढण्यास भाग पाडून मित्रानेच तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना धक्कादायक घटना गावदेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच २३ वर्षांच्या आरोपी मित्राला गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत मुलगी ही नेपीयन्सी रोडवर राहत असून सध्या शिक्षण घेते. काही दिवसांपूर्वीच ती मरिनड्राईव्ह चौपाटीला फिरायला गेली होती. तिथेच तिची आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. ते दोघेही मोबाईलसह सोशल मिडीयावर एकमेकांच्या संपर्कात होते. तीन दिवसांपूर्वी ते दोघेही तिच्या घरापासून काही अंतरावर भेटले होते. यावेळी त्याने तिला रिसॉर्टवर फिरायला जाऊ, तिथे खूप मजा करु असे सांगून नालासोपारा येथील एका रिसॉर्टवर आणले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिच्याशी शारीरिक लगट करण्यचा प्रयत्न केला होता, मात्र तिने त्याला विरोध केला होता. काही वेळानंतर त्याने तिच्या कपड्यावर पाणी टाकून तिला कपडे काढण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तिच्याशी जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तिने घरी जाण्याचा आग्रह केल्यानंतर त्याने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
दुसर्या दिवशी घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची गावदेवी पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध ६४ (१), १३७ (२), ३५१ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच गुरुवारी २३ वर्षांच्या आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली. तपासात आरोपी वडाळा येथे राहत असून मासेमारी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.