नाकाबंदीदरम्यान मंदिरात चोरी करणार्‍या दुकलीस अटक

चोरीच्या मुद्देमालासह दोघांना गावदेवी पोलिसांकडे स्वाधीन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जून 2025
मुंबई, – नाकाबंदीदरम्यान मंदिरात चोरी करणार्‍या एका दुकलीस वडाळा पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही चोरीच्या मुद्देमालासह गावदेवी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. रफिउल्ला एहसानउल्ला खान आणि राजू लक्ष्मण कांबळे अशी या दोघांची नावे आहेत. चोरीचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेशावरुन सोमवारी रात्री उशिरा वडाळा पोलिसांनी गोदरेज जंक्शन, फ्री वे ब्रिजजवळील उत्तर वाहिनीवर नाकाबंदीचे आयोजन केले होते. नाकाबंदी सुरु असताना पोलिसांना एक टॅक्सी संशयास्पदरीत्या येताना दिसली होती. त्यामुळे त्यांनी ती टॅक्सी थांबवून आतील दोन्ही संशयितांची चौकशी केली होती. पोलिसांना पाहताच ते दोघेही गोंधळून गेले होते. त्यांच्याकडे एक आयाताकृती स्टिलची दानपेटी आणि पांढर्‍या धातूचा, त्यावर लाल रंगाचा मणी असलेला मुकूट सापडला. याबाबत विचारणा केल्यानंतर या दोघांनी गावदेवी येथील भुलाबाई देसाई रोडच्या स्वामीनाराण मंदिराच्या शेजारील शनि मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.

या मंदिरातून त्यांनी ती दानपेटी आणि मुकूट चोरी करुन पलायन केले होते, मात्र नाकाबंदीदरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यांचे नाव रफिउल्ला खान आणि राजू कांबळे असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही अ‍ॅण्टॉप हिल येथील संगमनगरचे रहिवाशी आहेत. यातील रफिउल्ला हा पेंटर असून राजू हा काहीच कामधंदा करत नाही. चोरीच्या मुद्देमालासह या दोघांनाही नंतर पुढील कारवाईसाठी गावदेवी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कालेकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर डोंगरे, पोलीस हवालदार सागर पवार, मनोज सोनावणे, पोलीस शिपाई सिद्धार्थ जगताप, नितीन परदेशी आणि धनराज कलाणे यांनी ही कामगिरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page