आंधप्रदेशातून गांजाची तस्करी करणार्या टोळीचा पर्दाफाश
ठाण्यासह सोलापूर-विशाखापट्टणम येथून तेराजणांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 ऑगस्ट 2025
ठाणे, – आंधप्रदेशातून आणलेल्या गांजाची तस्करी करणार्या एका आंतरराज्य टोळीचा खडकपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत ठाण्यासह सोलापूर आणि आंधप्रदेशच्या विशाखापट्टणम शहरातून तेरा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. बाबर उस्मान शेख, गुफरान हनान शेख, सुनिल मोहन राठोड, आझाद अब्दुल शेख, रेश्मा अल्लावुद्दीन शेख, शुभम ऊर्फ सोन्या शरद भंडारी, सोनू हबीब सय्यद, आसिफ अहमद अब्दुल शेख, प्रथमेश हरिदास नलवडे, रितेश पांडुरंग गायकवाड, अंबादास नवनाथ खामकर, आकाश बाळू भिताडे, योगेश दत्तात्रय जोध अशी या तेराजणांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी 115 किलो गांजासह पिस्तुल, जिवंत काडतुसासह गुन्ह्यांत वापरलेले चारचाकी, दुचाकी, वॉकीटॉकी आणि कॅश असा सुमारे सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील सहा आरोपी न्यायालयीन तर सात आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गेल्या काही महिन्यांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्याची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अॅण्टी नारकोटीक्स सेलला अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना आंबिवली रेल्वे स्थान फाटकाजवळील बनेली रोड परिसरात काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर खडकपाडा पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून बाबर शेख, गुफरान शेख आणि सुनिल राठोड या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा जप्त केला होता.
पोलीस तपासात या गांजाचे कनेक्शन कल्याण-बदलापूर, सोलापूर आणि महाराष्ट्रबाहेरील विशाखापट्टणमपर्यंंत पोहचल्याचे उघडकीस आले होते. या माहितीनंतर खडकपाडा पोलिसांनी वेगवेगळ्या टिमची नियुक्ती करुन या टिमला बदलापूर, सोलापूर आणि आंधप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे पाठविले होते. या सर्व ठिकाणाहून या पथकाने दहाहून अधिक आरोपींना ताब्यात घेऊन ठाणे येथे पुढील चौकशीसाठी आणले होते. त्यांच्या चौकशीत त्यांचा गांजा तस्करीत सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर नंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी 28 लाख 75 हजार रुपयांचा 115 किलो गांजा, एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, गुन्ह्यांतील दोन वॉकीटॉकी संच चार्जरसह, दोन कार, एक रिक्षा, एक बुलेट, एक अॅक्टिव्हा आणि काही कॅश आदी 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजा तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असून आंधप्रदेश येथील जंगल परिसरातील गांजा आणून त्याची वाहतूक करण्यासाठी ही टोळी विविध वाहनासह वॉकीटॉकीचा वापर करत होती.
गेल्या कित्येक महिन्यांत या टोळीचा गांजा तस्करीचा व्यवसाय सुरु होता. या गांजाची मुंबईसह ठाणे, नवी मुंबईसह इतर शहरात वाहतूक करुन नंतर विक्री केली जात असल्याचे तपासात उघडकीस आले. या सर्व तेरा आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतग्रत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सहाजणांची न्यायालयीन कोठडीत तर इतर सातजणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, साबाजी नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, विजय गायकवाड, संदीप भालेराव, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार सदाशिव देवरे, राजू लोखंडे, संदीप भोईर, योगेश बुधकर, निसार पिंजारी, पोलीस शिपाई सुरज खंडाळे, अनिल खरसान, राहुल शिंदे, अमीत शिंदे, खुशाल नेरकर, कांतीलाल वारघडे, अनंत देसले, सुरेश खंडाळे यांनी केली.