मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील भोईटी शिवारमधील सव्वादोन एकरच्या शेतात गांजाची शेतीचा वांद्रे युनिट ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या कारवाईत ५ कोटी ६३ लाख रुपयांचा २८१६ किलो गांजाचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर आरोपीला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१५ ऑगस्टला साकिनाका परिसरात काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून एका तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी ४७ किलो गांजा, गांजा वाहतूकीसाठी वापरलेली कार, मोबाईल असा सुमारे ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर आरोपी हा मूळचा धुळेचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले होते. त्याला तो गांजा किरण कोळी नावाच्या एका व्यक्तीने मुंबई शहरात विक्रीसाठी दिला होता, मात्र या गांजाची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर किरण कोळीच्या अटकेसाठी संबंधित पथक धुळे येथे जात होते. मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देत होता. याच दरम्यान या पथकाला आरोपीने धुळे येथील शिरपूर, भोईटी शिवारमध्ये सव्वादोन एकरच्या शेतात गांजाची शेती केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता नलावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, नितीन केराम, सुरेश भोये, रविंद्र मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर, अमोल कदम, पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, फाळके व अन्य पोलीस पथकाने तिथे अचानक कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांना तिथे गांजाची शेती करण्यात आल्याचे उघडकीस आले. या कारवाईत पोलिसांनी २७७४ किलो वजनाचा गांजा आणि वनस्पतीची झाडे, ४२.५०० ग्रॅम वजनाचे ओलसर-सुका गांजा असा २८१६ किलो वजनाचा गांजाचा साठा जप्त केला होता. या गांजाची किंमत ५ कोटी ६३ लाख रुपये इतकी आहे. याच गुन्ह्यांत आरोपीला अटक करुन जप्त केलेल्या गांजासह पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.