मुंबई शहरात गणेशोत्सवासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त

अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 ऑगस्ट 2025
मुंबई, – येत्या बुधवारी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होत असल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशमय वातावरण झाले आहे. या गणेशोत्सावाला कुठेही गालबोट लागू नये तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले असून शहात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलीस, अतिरिक्त आरपीएफ प्लाटून, एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्डसह वाहतूक पोलीस, बीडीडीएस, परिमंडळीय पोलीस अधिकारी, अंमलदार आदींना बंदोबस्ताकामी ठेवण्यात आले आहे. त्यात मुंबई पोलीस दलातील 36 पोलीस उपायुक्तासह 51 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2637 पोलीस अधिकारी आणि 14 हजार 430 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. संभाव्य घातपाताच्या पार्श्वभूमीच सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. संशयित व्यक्तींची कसून चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहे. दुसरीकडे कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बाधा येणार नाही याची सर्वच मुंबईकरांची काळजी घ्यावी तसेच पोलिसांना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्सावात साजरा केला जातो. 27 ऑगस्टला गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून 6 सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे. मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करताना शांतता आणि सतर्क राहण्याचे आवाहन सर्वच गणेश मंडळाना केले आहेत. या दरम्यान पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या काळात मुंबई पोलिसांनी शहरात जास्तीत जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त आरपीएफ प्लाटून, एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्डसह वाहतूक पोलीस, बीडीडीएस, परिमंडळीय पोलीस अधिकारी, अंमलदार आदींच्या मदतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह इतर सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, 36 पोलीस उपायुक्तासह 51 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2637 पोलीस अधिकारी आणि 14 हजार 430 पोलीस कर्मचार्‍यांना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण मुंबई शहरात पाच ते सहा हजाराहून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याच्या मदतीने लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याकडून गणपती मंडळाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी स्वयंसेवक, एनसीसी, तटरक्षक स्वयंसेवी संस्थाचा वापर करण्यात येणार आहे. स्थानिक पोलिसांसह एटीएसला संभाव्य घातपात होऊ नये म्हणून सतर्क राहण्यास सांगण्यत आले आहे. तसेच जलद प्रतिसाद पथकाला (क्यूआरटी) सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आहे.

गणेशोत्सवासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसरात जास्तीत जास्त नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेश दिले आहे. संशयित व्यक्तीची कसून चौकशी करा, संपूर्ण खात्री केल्यानंतर या व्यक्तीला सोडून द्या. तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि शासकीय-निमशासकीय इमारत, विधानभवन, मंत्रालय आदी ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले आहे. गणेशोत्सावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. या कालावधीत सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आले आहे.

गर्दीच्या ठिकाणी काही आक्षेपार्ह किंवा बेवारस वस्तू दिसल्यास त्याला हात लावू नये, त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यांना द्यावी. दक्षिण मुंबईत विशेषता गिरगाव, लालबाग, परळ, मलबार हिल, दादर, भायखळा, मरिनड्राईव्ह, खेतवाडी आदी प्रसिद्ध मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. या गर्दीचा फायदा घेऊन छेडछाडीचे प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर ते भायखळा तसेच लोअर परेल, प्रभादेवी, ग्रँटरोड, चर्नीरोड स्थानिक अतिरिक्त रेल्वे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. लोकल प्रवासात हुज्जडवाडी करणे, स्टंट करणार्‍यांवर रेल्वे पोलिसांनी विशेष नजर असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page