मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – डीडी चॅनेलवर प्रदर्शित होणार्या जय भारती या मालिकेसाठी घेतलेल्या सुमारे ४० लाखांचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी महेश प्रेमचंद पांडे या आरोपीस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. महेश हा मालिकेचा निर्माता असून गुन्हा दाखल होताच पळून गेला होता. अखेर दोन महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याने मालिकेच्या नावाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
समीर ठाकूरप्रसाद सिंह हे जोगेश्वरी येथे राहत असून त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. या व्यवसायासोबत ते सिनेसृष्टीत गुंतणुकदार, निर्माता आणि अभिनेता म्हणूनही काम करतात. त्यांनी काही मालिका, वेबसिरीज आणि चित्रपटासाठी अर्थसहाय्य केले आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत त्यांच्या एका मित्राने त्यांची महेश पांडेशी ओळख करुन दिली होती. महेशला प्रसारभारती (डीडी चॅनेल) चॅनेलवर जय भारती नावाची एक मालिका सुरु करायची होती. याबाबत त्याचा प्रसारभारतीसोबत एक करार झाला होता. मात्र आर्थिक कारणावरुन त्याची मालिका सुरु झाली नव्हती. त्यामुळे त्याने समीर सिंह यांना मालिकेत आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. महेशकडील प्रसारभारतीसोबत असलेल्या कराराची शहानिशा केल्यानंतर त्यांनी त्याच्या मालिकेसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात आठ महिन्यांत दरमाह ऐंशी हजाराप्रमाणे गुंतवणुक रक्कम व्याजासहीत परत करण्याचे नमूद करण्यात आले होते. या करारानंतर त्यांनी महेशला टप्याटप्याने ४० लाख रुपये दिले होते. करारानुसार पाच महिने त्याने त्यांना चार लाख रुपये व्याजाचे दिले होते. मात्र नंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले. पाठपुरावा केल्यानंतर तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
चौकशीनंतर त्याने त्याची मालिका सुरु केली नव्हती. मालिकेसाठी घेतलेल्या ४० लाखांचा त्याने वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन त्यांची फसवणुक केली होती. तसेच पैशांची मागणी करुनही त्याने गुंतवणुकीसह व्याजाची रक्कम परत केली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच समीर सिंह यांनी गोरेगाव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर महेश पांडेविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच महेश हा पळून गेला होता. त्याचा शोध सुरु असताना त्याला दोन महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.