गॅस कनेक्शन अपडेटच्या बहाण्याने वयोवृद्धाची फसवणुक
सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – पॅनकार्ड, बँकेचा ऍप अपडेटच्या नावाने फसवणुकीचे प्रकार सुरु असतानाच आता गॅस कनेक्शन सुरु ठेवण्यसाठी एमजीएल बिल अपडेटच्या नावाने सायबर ठगाकडून फसवणुकीचे प्रकार सुरु आहे. बोरिवली एका ६१ वर्षांच्या वयोवृद्धासह त्याच्या बँक खात्यातून अशाच प्रकारे अज्ञात सायबर ठगाने तीन लाख चाळीस हजार रुपयाचंी ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन या ठगांचा शोध सुरु केला आहे.
राजीव भास्कर मोहोरिकर नावाचे ६१ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार बोरिवलीतील गोराई परिसरात राहत असून त्यांचा फळांच्या विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी सकाळी दहा वाजता त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा मॅसेज आला होता. त्यात त्यांना गॅस कनेक्शन सुरु ठेवण्यासाठी एमजीएल बिल अपडेट करण्याविषयी सूचना देण्यात आली होती. या मॅसेजनंतर त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने त्यांना गॅस कनेक्शन सुरु ठेवण्यासाठी बिल भरावे लागेल. त्यामुळे मी बोलतो तसे करा असे सांगून त्यांना मोबाईलवरुन प्ले स्टोअरवरुन एमजीएल बील अपडेट नावाचे ऍप डाऊनलोड करणयास सांगितले. त्यामुळे त्यांनी ते ऍप डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऍप डाऊनलोड झाले नाही. त्यानंतर त्याच्या परवानीगने सेटींगमधून जाऊन ते ऍप डाऊनलोड केले. या ऍपमध्ये त्याने त्यांची बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितले. तो सांगत होता, त्याप्रमाणे ते त्यांची माहिती अपलोड करत होते. यावेळी त्यांना बँकेतून कोणतीही ओटीपी आले नाही% तरीही त्यांच्या बँक खात्यासह क्रेडिट कार्डवरुन काही ऑनलाईन व्यवहार होऊन ३ लाख ४० हजार ७१७ रुपये डेबीट झाले होते. पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.