मुस्लिम संघटनेला आर्थिक मदत केल्याचा आरोप करुन गंडा
वयोवृद्धाला 87 लाखांना गंडा घालणार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जानेवारी 2026
मुंबई, – भारतविरोधी मुस्लिम संघटनेला आर्थिक मदत केल्याचा आरोप करुन अटकेची धमकी देऊन एका वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने सुमारे 87 लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वयोवृद्धाच्या तक्रारीवरुन तीन अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पूर्व सायबर सेलने फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
64 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार केतन झवेरचंद शहा हे घाटकोपर परिसरात राहतात. याच परिसरात त्यांच्या मालकीचे काही शॉप असून त्यांनी ते शॉप भाड्याने दिली आहेत. 25 डिसेंबरला ते त्यांची आत्या मनीबेन अमृतलाल शाह हिच्या कांदिवलीतील घरी गेले होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तो डाटाा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून विनितकुमार नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध नाशिक पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी त्यांना नाशिक येथे यावे लागेल असे सांगून त्यांना नाशिक पोलिसाकडून कॉल येईल असे सांगितले.
29 डिसेंबरला त्यांना अन्य एका व्यक्तीने व्हॉटअप कॉल केला होता. त्याने तो राष्ट्रीय तपास यंत्रणेतून पोलीस अधिकारी प्रदीप जैस्वाल असल्याचे सांगून त्यांच्या सिमकार्डववरुन बर्याच लोकांना एमएमएस गेले आहे. त्यांच्या बँक खात्यात दहा टक्के कमिशनवर काही रक्कम पाठविण्यात आली आहे. ही रक्कम मुस्लिम संघटनेला भारतविरोधी काम करण्यासाठी मदत करण्यासाठी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे असल्याचा दावा त्याने केला होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने 29 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 या कालावधीत व्हिडीओ कॉल करुन त्यांच्याविरुद्ध काही पुरावे असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च न्यायालयासह स्टेट बँकेच्या आदेशावरुन त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची सर्व मालमत्ता बँक होणार आहे, बँक खाती गोठविण्यात येणार आहे अशी धमकी देत त्यांच्यावर कुठल्या क्षणी अटकेची कारवाई होणार असल्याचे सांगितले.
त्यांना दहाजणांचे फोटोसह काही कागदपत्रे दाखविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांना पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना ती रक्कम परत केली जाईल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याने दिलेल्या बँक खात्यात 87 लाख 40 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. काही दिवसांनी त्यांना प्रदीप जैस्वाल याने कॉल करुन त्यांच्याविरुद्ध सुरु असलेली चौकशी पूर्ण झाली आहे. त्यात त्यांचा सहभाग नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे दोन दिवसांत त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगितले. मात्र त्यांनी ती रक्कम पाठविली नाही. त्याला कॉल केल्यानंतर त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यांची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे उघडकीस येताच त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पूर्व सायबर सेल विभागाकडे सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास सुरु केला असून ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या संबंधित बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.