कौटुंबिक वादातून पतीवर पत्नीसह वडिलांकडून ऍसिड हल्ला
घाटकोपर येथील घटना; दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जून २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून विनोदकुमार उमेदसिंग बिरमान या ३२ वर्षांच्या व्यक्तीवर त्याच्याच वडिलांसह पत्नीने ऍसिड हल्ला केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. त्यात विनोदकुमार हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर नवी मुंबईतील कळंबोली, एमजीएम हॉस्पिअलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी विनोदकुमारची पत्नी मधुलिका विनोदकुमार बिरमान आणि वडिल उमेदसिंग जंडुराम बिरमान यांच्याविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
ही घटना गुरुवारी २७ जूनला सकाळी साडेअकरा वाजता घाटकोपर येथील एलबीएस रोड, जॉगर्स पार्कमध्ये घडली. ३२ वर्षांचा विनोदकुमार हा घाटकोपर परिसरात परिसरात राहत असून मधुलिका ही त्याची पत्नी तर उमेदसिंग हे वडिल आहेत. तो घाटकोपरच्या एका दुकानात कामाला आहे. २०११ रोजी त्याचे वडिल उमेदसिंगने त्याचे लग्न मधुलिकाशी जबदस्तीने लावून दिले होते. या दोघांना बारा वर्षांचा एक मुलगा आहे. त्यावेळेस बिरमान कुटुंबिय नवी मुंबईतील खारघर, सेक्टर तीनमध्ये राहत होते. मधुलिका ही त्याला आवडत नव्हती, त्यामुळे त्यांच्यात फारसे पटत नव्हते. त्यावरुन त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. सतत होणार्या वादानंतर विनोदकुमार हा घर सोडून निघून गेला होता. तेव्हापासून तो घाटकोपर येथे राहत होता. गुरुवारी २७ जूनला विनोदकुमारला सुट्टी होती, त्यामुळे तो त्याच्या घरी होता. यावेळी त्याचे दुकानाचे मालक रोशन जैन तिथे आले होते. त्यांनी त्याची पत्नी आणि वडिल त्याला भेटण्यासाठी आले आहे असे सांगितले. त्यामुळे तो त्यांना भेटण्यासाठी जॉगर्स पार्कमध्ये भेटण्यासाठी गेला होता. तिथे गेल्यानंतर मधुलिकाने त्याच्याकडे घरखर्चासाठी पैसे मागितले होते. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. हा वाद इतका विकोपास गेला की त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. यावेळी रोशन जैन यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्याच्या पत्नीने त्याच्या पत्नीने बॉटलमधून कुठले तरी द्रव्य काढून त्याच्या डोक्यावर ओतले. यावेळी त्याच्या वडिलांनी त्याचे दोन्ही हात पकडून ठेवले होते. ते द्रव्य डोक्यावर पडल्यानंतर त्याला प्रचंड वेदना होऊ लागले. त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला होता. रोशन जैन यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यात काही द्रव्य त्याच्या अंगावर पडले. त्यात त्यांचा शर्ट जळाला होता.
या घटनेनंतर या दोघांनी बेशुद्धावस्थेत असलेल्या विनोदकुमार यांना एका रिक्षात बसवून खार येथील डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये आणले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांना ते हॉस्पिटलमध्ये असल्याचे समजले. त्यांची दुखापत गंभीर असल्याने त्यांना नंतर कळंबोलीतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी विनोदकुमार बिरमान याच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी त्याची पत्नी मधुलिका आणि वडिल उमेदसिंग यांच्याविरुद्ध ३२६ अ), ५०६ (२), ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.