बदलापूर येथील एमडी ड्रग्जच्या कारखान्यांचा पर्दाफाश
चार आरोपींना ८२ लाखांच्या एमडी व इतर मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बदलापूर येथे सुरु असलेल्या एमडी ड्रग्जच्या कारखान्यांचा घाटकोपर युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यातील एक आरोपी उच्चशिक्षित आहे. त्याने रसायनशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले असून एका खाजगी कंपनीत प्रोडेक्शन मॅनेजर म्हणून कामाला आहे. अटकेनंतर या चौघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३३ लाख ६० हजाराचा एमडी ड्रग्ज, १५८० किलो पांढर्या रंगाची पावडर, चार मोबाईल व इतर मुद्देमाल असा सुमारे ८२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चौघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे.
घाटकोपर परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी ११ सप्टेंबरला तिथे दोन तरुण आले होते, या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना १०६ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत २१ लाख २० हजार रुपये आहे. एमडी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असताना या दोघांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीतून त्यांच्या तिसर्या सहकार्याचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून एमडी ड्रग्ज बनविणार्या एका कारखान्याचंा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर या पथकाने बदलापूर येथील वांगणी, बदलापूर-कर्जत हायवेजवळील एका कारखान्यात छापा टाकला होता. या कारखान्यातून पोलिसांनी २०६ किलो विविध केमिकल, १ किलो ५८० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्याच्या चौकशीतून त्यांच्या अन्य एका सहकार्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा आरोपी उच्चशिक्षित असून त्याने रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. तो बदलापूरच्या एका खाजगी कंपनीत प्रोडेक्शन मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्यानेच त्याच्या शिक्षणाचा फायदा घेऊन बदलापूर परिसरात एमडी ड्रग्ज बनविण्याचा एक कारखाना सुरु केला होता. अशा प्रकारे घाटकोपर युनिटने एमडी ड्रग्जच्या कारखान्यांचा पर्दाफाश केला. या कारवाईत चार आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ८२ लाखांचा एमडी ड्रग्जसहीत इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक भगवान बेले, पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील, अभिजीत अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राघवेंद्र लोंढे व अन्य पोलीस पथकाने केली.