१.१५ कोटीच्या हेरॉईनसह दोघांना अटक

गोरेगाव येथे घाटकोपर एएनसीची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० डिसेंबर २०२४
मुंबई, – आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी पंधरा लाख रुपये किंमत असलेल्या हेरॉईनसह दोघांना घाटकोपर युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दोन्ही आरोपी उत्तराखंडचे रहिवाशी असून त्यांच्याकडून पोलिसांनी २८८ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे हेरॉईन जप्त केला आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी सायंकाळी घाटकोपर युनिटचे एक विशेष पथक गोरेगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी आरे मिल्क कॉलनीजवळ काहीजण हेरॉईनची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसंनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी तिथे दोन तरुण आले होते, या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना २८८ ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत एक कोटी पंधरा लाख रुपये इतकी आहे. या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर घाटकोपर युनिटच्या कार्यालयात आणण्यात आले.

चौकशीत ते दोघेही पेडलर्स म्हणून काम करत होते. त्यांना गोरेगाव येथील आरे मिल्क कॉलनीजवळ एका व्यक्तीला ते हेरॉईन देण्यास सांगण्यात आले होते. मात्र हेरॉईनची डिलीव्हरी करण्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी उत्तराखंडचे रहिवाशी आहे. हेरॉईन विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीने आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात हेरॉईनची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री उशिरा या गुन्ह्यांत अटकेची कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

२०२४ साली मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलने ८४ गुन्ह्यांची नांद करुन १७२ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून ३०१७ किलो ५९९ ग्रॅम वजनाचे विविध ड्रग्जचा साठा जप्त केला असून त्याची किंमत ५९ कोटी ६७ लाख रुपये इतका आहे. त्यात हेरॉईनसंबंधित सात गुन्ह्यांची नोंद झाली असून या गुन्ह्यांत २१ आरोपींना पोलिसांनी अटक केली. या सातही कारवाईत पोलिसांनी २ किलो ८९५ ग्रॅम वजनाचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत सव्वाअकरा कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page