मध्यप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रासह मजुराला अटक
दोन देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मध्यप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह एका 24 वर्षांच्या मजुराला पंतनगर पोलिसांनी अटक केली. अजय कैलास कायात असे या मजुराचे नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहे. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगणे, शस्त्रांची विक्री करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची मुंबई शहरात विक्री होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. या घातक शस्त्रांचा मुंबईतील वेगवेगळ्या गुन्ह्यांत वापर होत असल्याने अशा शस्त्र तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. रविवारी 9 नोव्हेंबरला पंतनगर पोलीस ठाण्याचे गुंडाविरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान घाटकोपर बस डेपोजवळ काहीजण इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांची विक्री येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त राकेश ओला, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार, पोलीस निरीक्षक अजीत गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, सोहम पाडवी, दगडू जाधव, पोलीस उपनिरीक्षक गिरीश हाटे, विक्रम ताकमोगे, पोलीस हवालदार भाऊपाटील घुगे, पोलीस शिपाई दळवी, राठोड, चव्हाण आदी पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. दुपारी तिथे अजय कायात आला असता त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे सापडले.
चौकशीत अजय हा मध्यप्रदेशच्या उज्जैन शहरातील बंडनगरच्या खंडवासुराचा रहिवाशी असून तिथेच मजुरीचे काम करत होता. त्याला ते घातक शस्त्रे एका व्यक्तीने मुंबई शहरात विक्रीसाठी पाठविले होते. या शस्त्रांच्या विक्रीतून त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळणार होती. मात्र घातक शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. दोन्ही देशी पिस्तूल आणि काडतुसे जप्त केल्यांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला ते शस्त्रे कोणी दिले, तो शस्त्रे कोणाला विक्री करणार होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.