विकासकाकडून मिळणार्‍या निधीतून हप्ता मागण्याचा प्रयत्न

१९ हून अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुन्हेगारास अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – इमारतीच्या विकास कामासाठी विकसकाकडून मिळणार्‍या निधीतून खंडणीसाठी धमकी देणार्‍या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पंतनगर पोलिसांनी अटक केली. इरफान सगीर खान असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यातील तीनहून अधिक पोलीस ठाण्यात एकोणीसहन अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. खंडणीसाठी सोसायटीच्या वयोवृद्धासह इतर रहिवाशांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा इरफानवर आरोप आहे. खंडणीच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

६५ वर्षांचे तक्रारदार नोबा सारथी इपीली हे घाटकोपर येथील पंतनगर, साईछाया इमारतीमध्ये राहतात. याच इमारतीमध्ये इरफान हा राहत असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याची परिसरात प्रचंड दहशत आहे. त्यांच्या इमारतीच्या विकासकामासाठी त्यांना विकासकडून काही रक्कम मिळत होती. या रक्कमेतून आपल्याला ठराविक हप्ता मिळावा यासाठी इरफान हा सोसायटीच्या पदाधकिार्‍यासह रहिवाशांना धमकावत होता. सोमवारी सकाळी अकरा वाजता त्याने नोबा इपीली यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. दहशत निर्माण करण्यासाठी त्याने त्यांना मारहाण केली. यावेळी सोसायटीच्या इतर सभासदांनी इरफानला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने सोसायटीच्या पदाधिकार्‍यासह इतर रहिवाशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. घडलेला प्रकार नोबा इपीली यांनी पंतनगर पोलिसांना सांगून इरफानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीसह दुखापत करणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इरफानविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत इरफान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात चौदा, घाटकोपर पोलीस ठाण्यात तीन तर नौपाडा पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. खंडणीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page