मुलीचे अश्लील फोटो व्हायरलची धमकी देऊन खंडणी वसुली
प्रियकराविरुद्ध खंडणीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कॉलेजमध्ये शिकणार्या अठरा वर्षांच्या मुलीचे खाजगी अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याच प्रियकरानेच प्रेयसीच्या आईकडून ५० हजाराची खंडणी वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौशाद जामदार या प्रियकराविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी खंडणीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विश्वासाने आरोपीला पाठविलेले खाजगी अश्लील फोटो तक्रारदाराच्या मुलीला चांगलेच महागात पडले आहे. या फोटोचा गैरवापर करुन नौशादने तिच्या आईकडून ५० हजाराची खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
३९ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पतीसह तीन मुलांसोबत घाटकोपर परिसरात राहते. तिच्या पतीचा दूधाचा व्यवसाय आहे तर तिची मोठी सध्या बारावीत शिक्षण घेत आहे. तिने ब्युटीपार्लरचा कोर्स केला आहे. मात्र शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर ती सध्या घरीच असते. ती नौशाद नावाच्या तरुणाच्या संपर्कात होती. त्याने तिला गोड बोलून तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले होते. ही माहिती समजताच तिने तिच्या मुलीची समजूत काढून तिला भविष्याचा विचार करुन समजाविण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार नौशादला समजताच त्याने तक्रारदार महिलेस कॉल करुन जागृतीनगर मेट्रो स्थानकात बोलाविले होते. त्यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यांत ती त्याला भेटण्यासाठी तिथे गेली होती. यावेळी त्याने तिला तिच्या मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध आहेत. तिचे काही खाजगी अश्लील फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहे. ते फोटो व्हायरल करण्याची त्याने तिला धमकी दिली होती.
तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिला तिच्या मुलीचे काही अश्लील फोटो दाखविले होते. यावेळी तिने त्याला फोटो डिलीट करण्याची विनंती केली होती. मात्र त्याने फोटो डिलीट करण्यास नकार देऊन तिच्याकडे पैशांची मागणी केली आहे. ५० हजार रुपये दिले नाहीतर तिच्या मुलीचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी दिली होती. त्यामुळे तिने पैशांची व्यवस्था करुन नौशादला ५० हजार रुपये दिले होते. पैसे मिळाल्यानंतर त्याने तिच्या मुलीचे फोटो डिलीट करतो असे सांगून तेथून पलायन केले होते. यावेळी त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला तर परिणाम होतील अशीही धमकी दिली होती. मुलीच्या बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
मात्र ही रक्कम दिल्यानंतरही तो तिच्या मुलीचा सतत पाठलाग करुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यापासून तिच्या कुटुंबियांसह मुलीला धोका असल्याने तिने हा प्रकार घाटकोपर पोलिसांना सांगून नौशादविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर नौशाद जामदार याच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.