मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जानेवारी २०२५
मुंबई, – किरकोळ वादातून रतन डोळसे या ४२ वर्षांच्या व्यक्तीची पाचजणांच्या एका टोळीने बांबूसह तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पाचपैकी तीन मारेकर्यांना काही तासांत अटक केली. प्रकाश मारुती पोटे ऊर्फ गोट्या, वैशाली संजय मेहंदळे आणि करण कांबळे अशी या तिघांची नावे असून ते तिघेही घाटकोपरच्या भटवाडी, रामजीनगरचे रहिवाशी आहेत. हत्येच्या याच गुन्ह्यांत या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यात प्रेम मेहंदळे आणि प्रथमेश राठोड यांचा समावेश आहे. पळून गेलेल्या या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घाटकोपर येथील भटवाडी, रामजीनगर, चिंतामणी चाळीतील गल्ली क्रमांक दोनमध्ये घडली. याच परिसरात सुनिल सोमनाथ पट्टेकर हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून तो चालक म्हणून काम करतो. रविवारी सायंकाळी सुनिल आणि त्याचे दाजी रतन डोळसे हे गप्पा मारत होते. यावेळी त्यांचे त्याच परिसरात राहणार्या आरोपीशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. काही वेळानंतर सुनिल व रतन हे दोघेही त्यांच्या घरी निघून गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता पाचही आरोपी त्यांच्या घरात आले आणि त्यांनी त्यांच्यातील वादातून त्यांच्यावर लाकडी बांबूसह तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता.
या हल्ल्यात सुनिल आणि रतन हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे या दोघांनाही तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रतन यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते तर सुरेशला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. उपचारादरम्यान रतनचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुनिल पट्टेकर याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रकाश पोटे, वैशाली मेहंदळे, करण कांबळे, प्रेम मेहंदळे आणि प्रथमेश राठोड या पाचही आरोपीविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच हल्ल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना प्रकाश पोटे, वैशाली मेहंदळे आणि करण कांबळे या तिघांना पोलिसांनी घाटकोपर येथून अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत प्रेम आणि प्रथमेश या दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.