मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जानेवारी २०२५
मुंबई, – बार मालकाची सतत चौकशी करणे एका ४० वर्षांच्या व्यक्तीच्या जिवावर बेतल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. हर्ष किरण लालन असे या व्यक्तीचे नाव असून त्याची बारच्या कर्मचार्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच बारच्या मॅनेजरसह आठजणांना पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. संतोष संजीवा शेट्टी, शाहिद नबीजानमिया अन्सारी, पुट्टूस्वामी गावी गौडा, भगवान कुशल सिंह, सुनिलकुमार अर्जुनराम रवाणी, राजेशकुमार यादव, सोहेल ऊर्फ शेख अमीन हुसैन आणि अमर नाना पाटील अशी या आठजणांची नावे आहेत. ते सर्वजण घाटकोपरच्या हेडक्वार्टर बार ऍण्ड रेस्ट्रॉरंटचे कर्मचारी आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने आठही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शनिवारी २५ जानेवारीला रात्री दहा वाजता घाटकोपर येथील ९० फिट रोउ, हेडक्वार्टर रेस्ट्रॉरंट ऍण्ड बारमध्ये घडली होती. किरण जयंतीलाल लालन हे ६० वर्षाचे तक्रारदार अंधेरीतील रहिवाशी आहेत. मृत हर्ष हा त्यांचा मुलगा त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता ते घाटकोपर येथे हेडक्वार्टर बारमध्ये मालक संतोष शेट्टीला भेटण्यासाठी गेले होते. संतोष हा त्यांचा मित्र असून त्याला ते नेहमी भेटण्यासाठी येत होते. तिथे गेल्यानंतर संतोष तिथे नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याला फोन केला होता, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा हर्ष हा काऊंटरवर संतोष शेट्टीबाबत विचारणा करण्यासाठी गेला होता. याच कारणावरुन त्याचे बारच्या मॅनेजरसह वेटरशी वाद झाला होता.
या वादानंतर बारच्या मॅनेजरसह इतर वेटरांनी त्याला हाताने तसेच लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी तिथे बारचा मालक संतोष शेट्टी आला आणि त्याने त्यांच्यातील वाद सोडविले. मारहाणीत हर्ष हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर ते दोघेही अंधेरीतील हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये असताना हर्षची प्रकृती बिघडली होती. तो सतत उलटी करत होता. त्याचे संपूर्ण शरीर दुखत होते. त्यामुळे त्यांनी हर्षचे हातपाय दाबून त्याला शांत झोपण्यास सांगितले. दुसर्या दिवशी त्यांनी हर्षला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.
बेशुद्धावस्थेत असलेल्या हर्षला त्यांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यात त्याच्या शरीरात अनेक जखमा असल्याचे नमूद करण्यात आले होते. या जखमांमुळेच त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी किरण लालन यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.
या जबानीत त्यांनी त्यांचा मुलगा हर्षच्या मृत्यूस हेडक्वार्टरचा मॅनेजर, हाऊसकिपिंग, कॅशिअर, वेटर आदी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच बारचा मॅनेजर संतोष शेट्टीसह इतर सातजणांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते सर्वजण पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.