घाटकोपर येथे 65 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची हत्या
अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 नोव्हेंबर 2025
मुंबई, – घाटकोपर येथे राहणार्या शहनाज अनिस काझी या 65 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्या राहत्या घरात प्रवेश करुन अज्ञात मारेकर्यांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या मारेकर्यांचा शोध सुरु केला आहे. बुधवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घाटकोपर येथील हिमालय सोसायटी परिसरातील मुकूंद सोसायटीच्या ए विंगच्या ए/तेरामध्ये उघडकीस आली. याच सोसायटीमध्ये सायका रईस अन्सारी ही महिला तिचे पती आणि मुलीसोबत राहते. तिच्या सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक तेरामध्ये शहनाज ही वयोवृद्ध महिला गेल्या सात वर्षांपासून एकट्याच राहत होती. तिचे पती अनिसने दोन लग्न केले असून त्यापैकी शहनाज ही त्यांची पहिली पत्नी तर दुसरी पत्नी आयशा आहे. 2018 साली आयशाचे निधन झाले असून तिला पहिल्या पतीपासून चार मुले होती. अनिसपासून तिला दोन मुले झाली होती.
अनिसच्या निधनानंतर शहनाज ही तिथे एकटीच राहत होती. बुधवारी सायंकाळी सहा वाजता सायकाची मुलगी येमनने तिला कॉल केला होता. तिने शहनाजची बहिण नेहा ऊर्फ मीना कोलगावकर हिचा कॉल आला होता. ती शहनाजला कॉल करत आहे, मात्र ती कॉल घेत नाही. त्यामुळे सायका ही शहनाजकडे गेली होती, मात्र फ्लॅट आतून बंद होते. दरवाजा ठोठावून तिने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर तिने शेजारी राहणार्या पंडित यांच्याकडून तिच्या फ्लॅटची चावी घेतली होती. तिने चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यावेळी तिला शहनाज या बेडरुममध्ये बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
हा संशयास्पद वाटताच तिने सोसायटीच्या पदाधिकार्यांसह घाटकोपर पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. शहनाज यांना जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात शहनाजच्या घरात प्रवेश केलेल्या अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यात जड वस्तूने बेदम मारहाण करुन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर घाटकोपर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या मारेकर्यांचा पोलीस शोध घेत आहेत.