लग्न मोडल्याने न झालेल्या पत्नीच्या पतीवर प्राणघातक हल्ला
पाचजणांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा तर एकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 जून 2025
मुंबई, – साखरपुडा मोडून दुसर्या तरुणासोबत लग्न केल्याने तिच्या पतीवरच पाचजणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सुफियान सलीम शेख हा 31 वर्षांचा व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून फरहान वसीम मिर्झा या 26 वर्षांच्या एका हल्लेखोराला अटक केली तर हल्ल्यानंतर पळून गेलेल्या फैजान हबीब मिर्झासह इतर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना रविवारी पहाटे साडेचार वाजता घाटकोपर येथील चिरागनगर, मच्छिमार्केट, टी वन इमारतीसमोर घडली. याच परिसरातील जुम्मा खान चाळीत सुफियान शेख हा त्याची पत्नीसोबत राहतो. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. याच परिसरात फैजान राहत असून तो त्याचा नातेवाईक आहे. गेल्या वर्षी त्याचे त्याच्या पत्नीशी साखरपुडा झाला होता. मात्र फैजानच्या कुटुंबियांकडून हुंड्याची मागणी करण्यात आल्याने त्यांनी ते लग्न मोडले होते. त्यानंतर 1 जून 2024 रोजी तिने सुफियानसोबत वांद्रे येथील फॅमिली कोर्टात लग्न केले होते. तेव्हापासून ती सुफियानसोबत त्याच्या घाटकोपर येथील घरी राहत होती. तिने लग्न मोडले आणि सुफियानसोबत लग्न केल्याचा फैजानला प्रचंड राग होता.
रविवारी पहाटे साडेचार वाजता सुफियान हा मच्छिमार्केट टी वन इमारतीसमोरुन जात होता. यावेळी तिथे फैजानसह इतर तीन ते चारजण बसले होते. यावेळी त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर त्यांनी सुफीयानवर शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन लोखंड रॉड आणि कारच्या जॅकने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हल्ल्यानंतर ते सर्वजण पळून गेले होते. हा प्रकार समजताच स्थानिक रहिवाशांनी जखमी झालेल्या सुफियानला तातडीने भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तिथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हॉस्पिटल प्रशासनाकडून ही माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या सुफियानची जबानी नोंदवून घेतली, त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी पाचही हल्लेखोराविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच फरहान मिर्झा या आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. फैजान मिर्झासह इतर तीनजण पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.