मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर भावानेच लैगिंक अत्याचार केल्याचा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच २४ वर्षांच्या आरोपी भावाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. लैगिंक अत्याचाराला विरोध केल्यानंतर आरोपीने बहिणीसह आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. पिडीत मुलीवर भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे.
पिडीत तरुणी घाटकोपर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. आरोपी हा तिचा सख्खा भाऊ असून तो पीओपीचे काम करतो. जानेवारी ते सप्टेंबर महिन्यांत घरात कोणीही नसताना ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. तिने विरोध केल्यानंतर तो तिच्यासह आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. हा प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला असता त्याने त्यांना याबाबत कुठेही वाच्यता करु नका नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमीक दिली होती. या मुलीला अलीकडेच कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच तिने एका मुलाला जन्म दिला होता. पिडीत अल्पवयीन असल्याचे उघडकीस आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून ही माहिती घाटकोपर पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
यावेळी पिडीत तरुणीसह तिच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध ३७६, ३७६ (२), (एफ), ३७६ (२), (जे), ३७६ (एन), (२), ५०६ (२) भादवी सहकलम ५ (जे), (२), (एल), (एन), ४, ६, ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी भावाला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत तरुणीवर भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सागितले. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.