मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, नवी मुंबईतील एका बारमध्ये काम करणारा मॅनेजर त्याच्या एका सहकार्याच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याचे घाटकोपर येथील एका कारवाईत उघडकीस आले आहे. याप्रकरणी जगदीश मरी या 43 वर्षांच्या बार मॅनेजरला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली असून मेडीकलनंतर या चारही तरुणींना देवनार येथील शासकीय महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत धर्मेंद्र सोनकर या व्यक्तीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
जगदीश मरी हा चेंबूर परिसरात राहत असून नवी मुंबईतील एका बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. तो त्याच्या संपर्कात असलेल्या तरुणींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवतो. ग्राहकांच्या मागणीनुसार या तरुणींना मुंबईसह नवी मुंबईतील विविध हॉटेलमध्ये शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या माध्यमातून जगदीशला संपर्क साधला होता. त्याच्याकडे काही तरुणींची मागणी करुन त्यांना घाटकोपर येथील एका हॉटेलमध्ये बोलाविण्यात आले होते.
यावेळी जगदीश आणि बोगस ग्राहकामध्ये मोबाईलवरुनच सर्व आर्थिक व्यवहार ठरला होता. सोमवारी दुपारी सव्वातीन वाजता जगदीश हा चार तरुणीसोबत घाटकोपर येथील एलबीएस मार्गावरील एका हॉटेलमध्ये आला होता. तिथेच त्याला बोगस ग्राहक भेटला. त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवंतसिद्ध ठिंगले, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे, पोलीस हवालदार गव्हाणे, निलेश पवार, महिला पोलीस शिपाई मोहीनी हुले, आरोटेसह अन्य पोलीस पथकाने तिथे छापा टाकला होता.
जगदीशसोबत असलेल्या 21 ते 23 वयोगटातील चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली. त्यांच्या चौकशीतून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. जगदीश हा धर्मेदद्रसोबत त्यांना विविध ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी हॉटेलमध्ये पाठवत होता. ग्राहकांकडून मिळणारी अर्धी रक्कम ते दोघेही स्वतजवळ तर उर्वरित अर्धी रक्कम ते संबंधित तरुणींना देत होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर जगदीश आणि धर्मेद्र यांच्याविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत नंतर जगदीश मरी याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुटका केलेल्या चारही तरुणींना मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते, मेडीकलनंतर त्यांना देवनार येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.