चारित्र्याच्या संशयावरुन विवाहीत प्रेयसीची आत्महत्या

घाटकोपर येथील घटना; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – प्रेमसंबंधातून पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्यासाठी आलेल्या आश्‍विनी नावाच्या विवाहीत प्रेयसीने सोमवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबादास रामदास मोरे या ३५ वर्षांच्या आरोपी प्रियकराविरुद्ध पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन प्रेयसीचा मानसिक व शारीरीक शोषण करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा अंबादासवर आरोप आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

४९ वर्षांचे तक्रारदार मूळचे जळगावचे रहिवाशी असून ते शेत मजुर म्हणून काम करतात. त्यांना पाच मुले असून त्यापैकी त्यांच्या दोन मुलीचे लग्न झाले आहे. त्यात आश्‍विनी नावाच्या मुलीचा समावेश असून तिचे सात वर्षांपूर्वी बुलढाणा येथे राहणार्‍या एका तरुणासोबत विवाह झाला होता. तेव्हापासून ती तिच्या पतीसोबत राहत असून त्यांना चार वर्षांचा एक मुलगा आहे. २०२० साली तिची अंबादास या रिक्षाचालकासोबत ओळख झाली होती. अंबादास हा विवाहीत असून त्याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नव्हते. त्यामुळे या दोघांचे मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले होते. हा प्रकार नंतर आश्‍विनीच्या पतीला समजताच त्यांच्यात खटके उडू लागले होते. समजूत घालूनही तिचे प्रेमसंबंध सुरु होते. त्यामुळे त्याने तिला तिच्या माहेरी पाठवून दिले होते. एक वर्ष ती तिच्या माहेरी राहत होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी तिची समजूत घालून तिला पुन्हा घरी आणले होते. घरी आणल्यानंतरही तिचे अंबादाससोबत प्रेमसंबंध सुरु होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये पुन्हा खटके आणि वादविवाद होऊ लागले होते. या वादाला कंटाळून आश्‍विनीने तिच्या पतीचे घर सोडून अंबादाससोबत राहण्यासाठी आली होती. अंबादासने तिच्यासह त्याच्या पत्नीसाठी घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीत भाड्याने दोन रुम घेतले होते. जून २०२३ ते २५ मार्च २०२४ या कालावधीत आश्‍विनी त्याच्यासोबत तिथे राहत होती.

गेल्या काही दिवसांपासून अंबादास हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्याच्याकडून सुरु असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला आश्‍विनी ही प्रचंड कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने ही माहिती तिच्या आई-वडिलांना सांगितली होती. यावेळी तिच्या पालकांनी तिला गावी येण्याचा सल्ला दिला. मात्र बदनामीमुळे तिने गावी जाण्याचे टाळले होते. अंबादासकडून होणार्‍या छळामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने सोमवारी २५ मार्चला रात्री दहा वाजता तिच्या घाटकोपर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजता हा प्रकार उघडकीस येताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ही माहिती नंतर तिच्या पालकांना देण्यात आली होती. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या पालकांना देण्यात आला. याप्रकरणी आश्‍विनीच्या वडिलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्यांनी अंबादास हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा माननिक व शारीरिक शोषण करत होता. या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त करुन अंबादासविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अंबादास मोरे याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page