कौटुंबिक वादातून २४ वर्षांच्या महिलेची आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून श्रद्धा तेजस सावंत या २४ वर्षांच्या महिलेने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. श्रद्धाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती तेजस जयवंत सावंत, सासू तेजश्री जयवंत सावंत आणि सासरे जयवंत सावंत यांच्याविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. श्रद्धाचे तेजससोबत गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत प्रेमविवाह झाला होता, लग्नाच्या तीन महिन्यांत त्यांच्यात तेजसच्या पूर्वीच्या अफेसरवरुन वाद झाले आणि त्यातून होणार्या वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
शुभम रामनाथ सानप हा २२ वर्षांचा तरुण डोबिंवलीतील कल्याण रोड, त्रिमुर्ती नगर परिसरात राहत असून तो रेल्वेमध्ये कामाला आहे. २०११ रोजी त्याची आई मनिषा तर २०१२ साली वडिल रामनाथ सानप यांचे निधन झाले होते. तेव्हापासून तो त्याची बहिण श्रद्धासोबत अहमदनगरच्या संगमनेर येथे राहत होता. श्रद्धाची ओळख तिची आतेबहिण देवयानी साईराज सावंत हिच्यामार्फत तेजसशी झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले होते. त्यानंतर ८ ऑक्टोंबर २०२३ रोजी या दोघांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ती घाटकोपर येथील गावदेवी रोड, बाबू गेनू मैदानाजवळील अमिनाबाई चाळ, तेजस निवास येथे राहण्यासाठी आली होती. विवाहानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यांत तिचे तेजससोबत क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन वाद होऊ लागले होते. तेजसच्या मोबाईलमध्ये तिने अफेसरपूर्वी त्याचे काही तरुणीसोबत असलेले फोटो पाहिले होते. त्यावरुन त्यांच्यात वाद विकोपास गेला होता. याच कारणावरुन तो तिला सतत मारहाण करत होता.
सतत होणार्या भांडणानंतर शुभम हा श्रद्धाला त्याच्या डोबिवलीतील राहत्या घरी घेऊन आला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी तेजस हा मद्यप्राशन करुन तिला पुन्हा घरी नेण्यासाठी आला होता. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. या वादानंतर श्रद्धाने सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र तिला वेळीच तेजससह शुभमने अडविले. त्यानंतर शुभमने तिची समजूत काढून तिला पुन्हा तेजससोबत घाटकोपर येथे पाठविले होते. मात्र सासरी आल्यानंतरही त्यांच्यातील वाद सुरु होते. या वादाला श्रद्धाला कंटाळून गेली होती. त्यातून तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून तिने रविवारी रात्री दोन वाजता तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहिती समजताच शुभमसह इतर नातेवाईकांनी घाटकोपर येथे घाव घेतली होती. राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना श्रद्धाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजले. या माहितीनंतर शुभमला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
चौकशीदरम्यान २४ नोव्हेंबरला रात्री बारा वाजता शुभम आणि श्रद्धा यांच्यात पुन्हा वाद झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी तिची सासू तेजश्री, सासरे जयवंत सावंत आणिजाऊ देवयानी सावंत गेले होते. यावेळी जयवंतच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जवळच्या सत्यम हॉस्पिटलमध्ये नेण्यत आले होते. यावेळी तेजश्रीने जयवंत यांचे काही बरे वाईट झाल्यास तिला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर काही वेळानंतर श्रद्धा ही तिच्या रुममध्ये गेली आणि तिने घरातच पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शुभमची घाटकोपर पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्याने श्रद्धाचा पती तेजस, सासरे जयवंत आणि सासू तेजश्री या तिघांवर श्रद्धाच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी श्रद्धाला मारहाण करुन धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.