मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मे २०२४
मुंबई, – घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी स्टॅबिलिटी प्रमाणपत्र देणार्या एका इंजिनिअरला एसआयटीने अटक केली. मनोज रामकृष्ण संधू असे या इंजिनिअरचे नाव असून या गुन्ह्यांत अटक झालेली ही दुसरी अटक आहे. त्याला शुक्रवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत भावेश प्रभुदास भिंडे याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेल्या भावेशला गुरुवारी किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान या गुन्ह्यांत आता १२० बी या कलमाची वाढ करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच घाटकोपर येथे युवा कंपनीचे एक होर्डिंग जवळच असलेल्या एका पेट्रोलपंपावर कोसळून त्यात सतराजणांचा मृत्यू झाला होता तर ऐंशीहून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याचा तपास आधी गुन्हे शाखा तर नंतर एसआयटीकडे सोपविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत भावेश भिंडे याला १७ मेला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपत होती. त्यामुळे त्याला दुपारी पुन्हा किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत मनोज संधू या दुसर्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. भावेशच्या कंपनीला मनोज यानेच स्टॅबिलिटी प्रमाणपत्र दिले होते. महानगरपालिकेने काही इंजिनिअरला स्टॅबिलिटी प्रमाणपत्र देण्याची परवानगी दिली होती. त्यात मनोज संधूचा समावेश होता. २०२३ रोजी त्याने ते प्रमाणपत्र दिल्यानंतर अवघ्या वर्षभरात हे होर्डिंग कोसळले होते.
या गुन्ह्यांत भावेशच्या कंपनीच्या एका महिला अधिकार्याचा सहभाग उघडकीस आला होता. अटकेच्या भीतीने तिने विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. तिच्या अटकपूर्व जामिनाला पोलिसांचा विरोध आहे. त्यामुळे तिला अटकपूर्व जामिन मिळणार नाही यासाठी एसआयटीने प्रयत्न सुरु केला आहे. तिची याचिका फेटाळली गेल्यास तिच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. भावेश, त्याची पत्नी आणि संबंधित महिलेच्या बँक खात्यात काही पैसे जमा झाले होते. याच गुन्ह्यांत काही बँक खाती तपासल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. दुसरीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांचीही दोन वेळा पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली आहे. एखादा प्रस्ताव आल्यानंतर तो वरिष्ठांकडे पाठविला जातो. त्यानंतर वरिष्ठांकडून संबंधित प्रस्तावावर चर्चा होऊन तो प्रस्ताव मंजुर केला केला जातो. त्यामुळे होर्डिंगचा प्रस्तावाला कुठल्या अधिकार्यांनी मान्यता दिली होती. त्यावर कुठल्या अधिकार्याने काय शेरा दिला होता याचा तपास एसआयटी करत आहे.