लंडनहून पाठविलेल्या गिफ्टच्या नावाने शिक्षिकेची फसवणुक
कस्टम ड्यूटीसह टॅक्सच्या नावाने सात लाखांना गंडा घातला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पायलट असल्याची बतावणी करुन लंडनहून गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने एका ५१ वर्षांच्या शिक्षिकेची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याची घटना मालाड परिसरात घडली. गिफ्टमध्ये विदेशी चलन असल्याचे सांगून तिला कस्टम ड्यूटीसह विविध टॅक्सच्या माध्यमातून सुमारे सात लाखांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षिकेच्या तक्रार अर्जावरुन बांगुरनगर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली, त्या बँक खात्याची माहिती काढण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.
तक्रारदार महिला ही मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात एकटीच राहत असून ती तिच्या घरीच खाजगी शिकवणी घेते. त्यातूनच तिचा उदरनिर्वाह चालतो. नोव्हेंबर २०२३ तिला इंटाग्रामवर विष्णू पटेल नावाच्या एका व्यक्तीचा मॅसेज आला होता. या मॅसेजनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. चॅटदरम्यान त्याने तिला त्याच्या वडिलांचे निधन झाले असून तो त्याच्या आई आणि बहिणीसोबत ब्राझिलमध्ये राहतो. त्यांचे कुटुंबिय मूळचे गुजरातच्या सुरत शहरातील रहिवाशी असून तो एका खाजगी कंपनीत पायलट म्हणून काम करतो असे सांगितले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिला प्रपोज केले होते. तिनेही त्याला होकार दिला होता. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लंडनला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले होते. नोव्हेंबर महिन्यांत त्याने तिला विदेशातून एक गिफ्ट पाठविले होते. त्यात एक पर्स, मोबाईल आणि वीस हजार पौंड होते. २६ नोव्हेंबरला तिला दिल्ली एअरपोर्टवरुन एका महिलेने फोन करुन ती कस्टम अधिकारी असल्याचे सांगितले. तिचे लंडन येथून एक पार्सल असून त्यात विदेशी चलन आहेत. त्यामुळे तिला काही रक्कम टॅक्स म्हणून भरण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने दिलेल्या बँक खात्यात टॅक्स ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर तिला विविध कारण सांगून आणखीन पैसे भरण्यास सांगण्यात आले होते.
त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने २९ नोव्हेंबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत विविध बँक खात्यात सुमारे सात लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र कस्टम ड्यूटीसह टॅक्स आणि इतर कारणासाठी पैसे घेऊन तिला ते पार्सल मिळाले नाही. कोणतेही गिफ्ट न पाठविता तिची संबंधित सायबर ठगांनी ऑनलाईन सुमारे सात लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने अलीकडेच बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी संबंधित सायबर ठगाविरुद्ध फसवुणकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.