गिरगाव येथे क्षुल्लक वादातून सहकारी कर्मचार्‍याची हत्या

हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 नोव्हेंबर 2025
मुंबई, – गिरगाव येथे क्षुल्लक वादातून रमेश हजाजी चौधरी या 39 वर्षांच्या सहकारी कर्मचार्‍याची त्याच्या सहकार्‍याने लाकडी स्कूटलसह अग्निशमन उपकरणानी बेदम मारहाण करुन हत्या केली होती. याप्रकरणी सुरज संजय मंडल या 22 वर्षांच्या आरोपीविरुद्ध व्ही. पी रोड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही.

ही घटना रविवारी मध्यरात्री एक ते दिडच्या सुमारास गिरगाव येथील खेतवाडी सातवी गल्ली, इमारत क्रमांक तेरामध्ये घडली. याच ठिकाणी सेंटेक कोटेड स्टिल प्रायव्हेट लिमिटेड नावाचे एक शॉप आहे. याच शॉपमध्ये रमेश चौधरी आणि सुरज मंडल हे दोघेही कामाला होते. दिवसभर काम करुन ते शॉपच्या पहिल्या मजल्यावर झोपत होते. रविवारी रात्री उशिरा या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात सुरजने रमेशला लाकडी स्टूलसह अग्निशमन उपकरणाने बेदम मारहाण केली होती. त्यात तो रक्तबंबाळ झाला होता.

ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच व्ही. पी रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या रमेशला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या हत्येमागे सुरज मंडलचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर तो घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

प्राथमिक तपासात रमेश चौधरी हा गुजरातच्या बनासकाटा, धनोराच्या भातरामचा रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासून तो गिरगाव येथे मजुर म्हणून कामाला होता. आरोपी सुरज मंडल हा बिहारचा रहिवाशी असून हत्येनंतर तो बिहारला पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याला बिहारला पळून जाण्यापूर्वी अटक केली जाणार असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले. या दोघांमध्ये कुठल्या कारणावरुन वाद झाला होता याचे कारण समजू शकले नाही. सुरजच्या अटकेनंतर याबाबत अधिकृत खुलासा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page