3 कोटीच्या सोन्याच्या बार अपहारप्रकरणी दोघांना अटक
आरोपींची संख्या चौदावर; 2.19 कोटीचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2025
मुंबई, – सुमारे तीन कोटीच्या सोन्याचा बार अपहारासह फसवणुकीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केल आहे. विठ्ठल अण्णा गिड्डे आणि दत्तात्रय सुखदेव बाबर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या अटकेनंतर या गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चौदा झाली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी आतापर्यंत 2 कोटी 19 लाख 53 हजाराचे सोन्याची लगड आणि कॅश आदी मुद्देमाल जप्त केला आहे. इतर काही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
शैलेशकुमार लालचंद जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्यासह त्यांचा भाऊ विवेककुमार लालचंद जैन यांचा सोने आणि चांदीचे कॉईन आणि बार बनविण्याचा व्यवसाय आहे. भायखळा येथील पाईस स्ट्रिट, विणा किल्लेदार इंडस्ट्रियल इस्टेट, निर्मल कंपाऊडमध्ये त्यांच्या मालकीचा एक कारखाना असून तिथे 35 कामगार कामाला होते. दलपतसिंग उदावत आणि पुखराज अजीतराम हे दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवाशी असून त्यांच्याकडे सोने व चांदीचे कॉईन आणि बार डिलीव्हरीचे काम करत होते. 21 जून 2024 रोजी त्यांनी पुखराजला शंभर ग्रॅम वजनाचे 40 सोन्याचे बार, वीस ग्रॅम वजनाचे अकरा सोन्याचे बार असे 4 किलो 220 ग्रॅम वजनाचे सुमारे तीन कोटीचे सोन्याचे बार झव्हेरी बाजार येथील रिद्धी-सिद्धी बुलियन लिमिटेड कंपनीला डिलीव्हरीसाठी दिले होते.
डिलीव्हरीसाठी गेलेला पुखराज तिथे गेला नसल्याचे नंतर शैलेशकुमार जैन यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद येत होता. त्याचा शोध घेतला असता तो कुठेच सापडला नाही. त्याची अॅक्टिव्हा बाईक सातरस्ता सर्कल येथे सापडली होती. बाईकच्या डिक्कीची तपासणी केली असता आतील तीन कोटीचे सोन्याचे बार घेऊन पुखराज हा पळून गेला होता. डिलीव्हरीसाठी दिलेल्या सोन्याचा बारचा अपहार करुन पुखराज हा पळून गेल्याची खात्री होताच शैलेशकुमार जैन यांनी आग्रीपाडा पोलिसात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना 19 जुलै 2024 रोजी अक्षय चंद्रकांत शाह, राजेश विमलचंद गोठी, 20 जुलैला तेजस राजेंद्र पारीख, 27 जुलैला मकबूल अहमद गुलाम मोहम्मद शेख या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर आरोपींची नावे उघडकीस आले होते. त्यानंतर सागर योगिनभाई झव्हेरीला पोलिसांनी अटक केली.
या आरोपींकडून पोलिसांनी 1 कोटी 80 लाख 39 हजार 800 हजाराचे सोन्याचे बार जप्त केले होते. या संपूर्ण कटात पुखराज हा मुख्य आरोपी असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पुखराज अजीतराम, रमेशकुमार मांगीलाल रावल, ललितकुमार प्रजापत, तेजराज केशुलाल रावल, विपुल झुहारमल सोनी या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 8 लाख 34 हजार 100 रुपयांचे सोन्याचे बार जप्त केले होते. त्यांच्या चौकशीत विठ्ठल गिड्डे आणि दत्तात्रय बाबर यांचे नाव समोर आले होते. पुखराजने त्यांना सोन्याचे बार विक्रीची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर विठ्ठल आणि दत्तात्रय या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
याच गुन्ह्यांत आतापर्यंत चौदा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी बारा आरोपीविरुद्ध पोलिसांनी 12 सप्टेंबर 2024 रोजी आरोपपत्र तर 30 नोव्हेंबर 2024 रोजी पुरवणी आरोपपत्र सादर केले होते. या आरोपींकडून पोलिसांनी 1 कोटी 88 लाख 73 हजार 900 रुपयांचे 3240 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड आणि 30 लाख 80 हजाराची कॅश जप्त करण्यात आले असून अद्याप 979 ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.