भारतातील मार्केटमध्ये नफा कमविण्याच्या नादात तुरुंगात गेली

१.५८ कोटीच्या गोल्डसह विदेशी महिलेस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – केनिया येथून चोरट्या मार्गाने आणलेल्या गोल्ड बारसह एका ३४ वर्षांच्या विदेशी महिलेस रविवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. नजमा शेख मोहम्मद असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून या अधिकार्‍यांनी २९५० ग्रॅम वजनाचे २४ कॅरेटचे सोळा गोल्ड बार जप्त केले आहे. त्याची किंमत १ कोटी ५८ लाख रुपये इतकी आहे. भारतातील मार्केटमध्ये गोल्ड बार विक्री करुन तिचा नफा कमविण्याचा उद्देश होता, मात्र हवाई गुप्तचर विभागाच्या कारवाईमुळे तिला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

नजमा ही मूळची केनियाची नागरिक आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका महिलेकडे उधारीवरुन गोल्ड बार घेतले होते. भारतात सोन्याला प्रचंड मागणी तसेच भाव मिळत असल्याने तिचा भारतातील मार्केटमध्ये गोल्ड बार विक्रीची योजना होती. त्यातून नफा मिळवून तिला पुन्हा केनियाला जायचे होते. त्यासाठी ती रविवारी केनियाच्या नैरोबी विमानतळावरुन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिच्याकडे गोल्ड बार असल्याची माहिती मिळताच हवाई गुप्तचर विभागाने तिला विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होतै. तिच्या सामानाची झडती घेतल्यानंतर या अधिकार्‍यांना १ कोटी ५८ लाख १५ हजार रुपयांचे सोळा गोल्ड बार सापडले. तस्करी मार्गाने आणलेले ते सर्व गोल्ड बार नंतर जप्त करण्यात आले होते.

याप्रकरणी नजमा शेख मोहम्मदला अटक करुन रविवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर तिला भायखळा येथील महिला कारागृहात पाठविण्यातआले. नफा कमवायला आली आणि तुरुंगात गेली अशीच अवस्था नजमाची झाली आहे. तिच्या अटकेची माहिती केनिया दूतावास अधिकार्‍यांना कळविण्यात आल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page