पन्नास हजाराच्या कमिशनसाठी ६५ लाखांच्या सोन्याची तस्करी
आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या प्रवाशाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० मार्च २०२४
मुंबई, – पन्नास हजाराच्या कमिशनसाठी सुमारे ६५ लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. सुभान बशीर अली असे या ४० वर्षीय प्रवाशाचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. सुभान हा रियाधहून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने घेऊन आला होता. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या तस्करीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हवाई गुप्तचर विभागासह इतर केंद्रीय तपास यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच रियाधहून येणार्या विमानातून काही प्रवाशी लाखो रुपयांच्या सोन्याची तस्करी करणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला प्राप्त झाली होती. त्यामुळे या अधिकार्यांनी रियाधहून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या बॅगेची तपासणी सुरु केली होती. याच दरम्यान सुभान हा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बाहेर जाण्याच्या तयारीत होता. त्याच्यावर संशय आल्याने त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने शरीरात लपवून आणलेले सुमारे ६५ लाख रुपयांचे सोन्याचे विटा जप्त केले.
चौकशीदरम्यान त्याला ते सोने रियाधहून एका व्यक्तीने दिले होते. ते सोने त्याला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला देण्यास सांगण्यात आले होते. या कामासाठी त्याला विमानाचे तिकिट आणि पन्नास हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले होते. मात्र ते सोने विमानतळावर बाहेर नेण्यापूर्वीच त्याला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. सुभान हा राजस्थानच्या मौसा अजमेर, कनाखेडाच्या कुडिया गावचा रहिवाशी असून तो काही दिवसांपूर्वी रियाधला गेला होता. अटकेनंतर त्याला रविवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पन्नास हजाराच्या कमिशनच्या सोन्याची तस्करी करणे सुभानला चांगलेच महागात पडले आहे.