सोन्याच्या दागिन्यांवर गुंतवणुकीच्या नावाने अनेकांना गंडा

मुख्य ज्वेलर्स व्यापार्‍यासह तिघांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मे 2025
मुंबई, – सोन्याच्या दागिन्यांसह कॅश स्वरुपातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणार्‍या एका टोळीचा दिडोंशी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकणी एका मुख्य आरोपी असलेल्या ज्वेलर्स व्यापार्‍यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. कुशल दलतपसिंग राठोड ऊर्फ कमलेश चौहाण, विनायक मारुती माने आणि सिबाराम ओमिया सावंत अशी या तिघांची नाव असून या कटातील कुशल हा मुख्य आरोपी आहे. या टोळीने आतापर्यंत 90 हून अधिक गुंतवणुकदारांची सुमारे चार कोटीची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील तक्रारदार संदीप नामदेव विनेरकर हे गोरेगाव परिसरात राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांना याच परिसरातील श्री ज्वेलर्स दुकानातील विविध आकर्षक सोन्याच्या दागिन्यांसह कॅश स्वरुपातील योजनेबाबत माहिती मिळाली होती. चौकशीअंती त्यांना कुशल हा ज्वेलर्स व्यापारी असून काही महिन्यांपूर्वीच त्याने गोरेगाव येथील संतोषनगर परिसरात श्री ज्वेलर्स नावाचे एक शॉप सुरु केले होते. या शॉपमध्ये त्याने ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना सुरु केल्या होत्या. सोन्याच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याने त्याच्याकडे अनेकांनी गुंतवणुक केली होती. त्यामुळे त्यांनीही कुशल राठोडची भेट घेऊन त्याच्याकडून सोन्याच्या गुंतवणुक योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या योजनेच्या माहितीनंतर त्यांनी त्याच्याकडे गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. या गुंतवणुकीनंतर त्यांना दिलेल्या मुदतीत परताव्यासह सोन्यांसह पैसे मिळाले नाही.

केशव राठोड हा दुकान बंद करुन पळून गेला होता. तपासात केशवने त्यांच्यासह अनेकांना या आकर्षक योजनेत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. जवळपास 90 हून अधिक गुंतवणुकदाराने त्याच्याकडे सुमारे चार कोटीची गुंतवणुक केली होती. त्यापैकी कोणालाही परताव्याची रक्कम तसेच सोने न देता केशवसह त्याचे इतर सहकारी पळून गेले होते. हा प्रकार उघडकीस येताच गुंतवणुकदारांनी दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत दिडोंशी पोलिसांनी कुशल राठोडसह त्याचे इतर सहकारी रवि युवराज शर्मा, छोटू, सुमीत व इतर आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुक महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेला मुख्य आरोपी कुशल राठोडला राजस्थानच्या जालोर, धवल गावातून शिताफीने ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून विनायक माने आणि सिबाराम सावंत यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांनाही मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिघांनाही अटक केल्यांनतर बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुंतवणुकदाराकडून घेतलेल्या पैशांसह सोन्याच्या विक्रीतून त्याने गावात मोठ्या प्रमाणात प्रॉपटी खरेदी केली होती. याच परिसरात एक ढाबा घेतला होता. या गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पाच आरोपीने कुशल राठोडला फसवणुकीसाठी मदत केली होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page