सोन्याच्या बिस्कीटच्या आमिषाने 3.68 कोटीच्या दागिन्यांचा अपहार
सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या व्यापार्याला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – सोन्याचे बिस्कीट देतो सांगून एका व्यापार्याकडून घेतलेल्या 3 कोटी 68 लाख रुपयांचा सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड ज्वेलर्स व्यापार्याला अखेर सात महिन्यानंतर अटक करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. विक्रमसिंग रामसिंग राव असे या व्यापार्याचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून त्याच्याकडून अपहार केलेले सर्व सोन्याचे दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राकेश संपतलाल ढोलीवाल हे मालाड परिसरात राहत असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांची क्लासिक कास्ट नावाची गोल्ड ऑर्नामेटस मेकींग नावाची एक खाजगी कंपनी आहे. शहरातील ज्वेलर्स व्यापार्यांना ते होलसेलमध्ये सोन्याचे दागिने बनवून देतात. या दागिन्यांच्या मोबदल्यात त्यांना दागिन्यांची रक्कम किंवा सोन्याचे बिस्कीट दिले जात होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची विजयसिंह राव याच्याशी ओळख झाली होती. विजयसिंह हा नवी मुंबईतील कौपरखैरणेचा रहिवाशी असून त्याचा काळबादेवी येथे श्री गुरुकृपा ज्वेल्स नावाचे ज्वेलर्स दुकान होते. त्याने त्यांच्याशी व्यवहार सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
विविध सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात त्याने त्यांना सोन्याचे बिस्कीट देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला मे-जून 2024 या कालावधीत 3 कोटी 68 लाख रुपयांचे 4 किलो 850 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिले होते. ठरल्याप्रमाणे त्याने पंधरा दिवसांत सोन्याचे बिस्कीट देण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही त्याने सोन्याचे बिस्कीट दिले नाही. अलीकडेच त्याने त्यांना सुरती हॉटेलजवळ बोलावून त्यांचे सोन्याचे बिस्कीट देणार नाही, दागिन्यांचे पैसेही देणार नाही. तुला काय करायचे ते कर, मी कोणालाही घाबरत नाही. कोणीही माझे काहीही करु शकत नाही अशी अप्रत्यक्षपणे धमकी दिली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विजयसिंह राव याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या विक्रमला अखेर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या चौकशीतून त्याने अपहार केलेल्या 3 कोटी 68 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा परस्पर इतर ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री केली आहे. त्यामुळे या ज्वेलर्स व्यापार्यांची माहिती काढून त्यांच्याकडून अपहार केलेले सर्व दागिने हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.