अडीच कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहारासह फसवणुक
गुन्हा दाखल होताच वॉण्टेड ज्वेलर्स व्यापार्याला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जुलै 2025
मुंबई, – व्यवसाय मंदीत असल्याची बतावणी करुन क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे अडीच कोटीच्या 3843 ग्रॅम वजनाच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी कालिदास जवाहरमल नागर या 48 वर्षांच्या व्यापार्याला कुरार पोलिसांनी अटक केली. कालिदास हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी असून तिथे त्याच्या मालकीचे एक ज्वेलर्स शॉप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचा दुसरा सहकारी व ज्वेलर्स व्यापारी वैभव पवनकुमार गांधी याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हितेशसिंग सोहनसिंह राव हे ज्वेलर्स व्यापारी असून ते कांदिवलीतील क्रांतीनगरात राहतात. गेल्या काही वर्षांपासून ते राजस्थान, गुजरात आणि आसाम राज्यातील ज्वेलर्स व्यापार्याकडून सोन्याचे दागिने खरेदी करुन त्यांची विविध व्यापार्यांना विक्री करतात. त्यातून त्यांना चांगले कमिशन मिळते. पाच वर्षांपूर्वी काळबादेवी, झव्हेरी बाजार, मरिनलाईन्स येथे दागिने विक्रीसाठी जाताना त्यांची वैभव गांधीशी ओळख झाली होती. तोदेखील ज्वेलर्स व्यापारी होता, त्याचा सागवाडा येथे एक ज्वेलर्स दुकान आहे. त्याने त्यांच्याकडून अनेकदा क्रेडिटवर सोन्याचे दागिने घेतले होते. त्याचे वेळेवर पेमेंट करुन त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता.
काही दिवसांनी वैभवने त्याचा मित्र कालिदास नागरशी त्यांची ओळख करुन दिली होती. तो राजस्थानचा रहिवाशी असून तिथे त्याचे एक ज्वेलर्स दुकान असल्याचे त्याने त्यांना सांगितले. वैभवच्या सांगण्यावरुन त्यांनी कालिदासलाही अनेकदा क्रेडिटवर सोन्याचे दागिने दिले होते. त्यांचा व्यवहार चांगला वाटल्याने त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. कोरोना काळात मंदीमुळे त्यांचा व्यवसाय काहीसा मंदावला होता. तरीही वैभव आणि कालिदासच्या मागणीनुसार त्यांनी त्यांना अनेकदा क्रेडिटवर सोन्याचे दागिने दिले होते. व्यवसाय सुरळीत सुरु झाल्यानंतर पेमेंट देण्याचे आश्वासन या दोघांनी हितेशसिंग यांना दिले होते.
ऑक्टोंबर 2021 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत त्यांनी हितेश आणि कालिदास यांना क्रेडिटवर 3843 ग्रॅम वजनाचे सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी दागिन्यांचे पेमेंट केले नाही. विविध कारण सांगून ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांना पोस्ट डेटेड चेक दिले होते. ते बँकेत टाकल्यानंतर त्यांचे बँक खाते बंद असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर या दोघांचा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कालिदास आणि वैभवची मार्केटमध्ये माहिती काढण्यास सुरुवात केली होती.
यावेळी त्यांना या दोघांनी मार्केटमधून अनेक ज्वेलर्स व्यापार्याकडून क्रेडिटवर सोन्याचे दागिने घेतल्याचे तसेच कोणालाही दागिन्यांचे पेमेंट दिले नसल्याचे समजले. त्यांच्या परिचित दिलीप सिंग, गोविंद सिंग, हरु बंगाली, सूर्या गोल्ड व इतर बर्याच ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक करुन ते दोघेही पळून गेले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कालिदास नागर आणि वैभव गांधी या दोन्ही ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना कालिदास नागरला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने वैभव गांधीच्या मदतीने त्यांनी आतापर्यंत अनेक ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. फसवणुकीचे दागिने त्यांनी कोणाला विक्री केले याची माहिती काढून ते दागिने हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु आहे. याच गुन्हयांत वैभवला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.