सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात बोगस बिस्कीट देऊन फसवणुक
चार गुन्ह्यांची उकल करुन तीनजणांच्या टोळीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 जून 2025
मुंबई, – बावीस कॅरेट सोन्याच्या दागिन्याच्या मोबदल्यात चौवीस कॅरेट सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक करणार्या एका टोळीचा बीकेसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका वयोवृद्धासह तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या अटकेनंतर बीकेसी पोलीस ठाण्यातील तीन तर व्ही. पी रोड पोलीस ठाण्यातील एक अशा चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चारही गुन्ह्यांत त्यांनी सुमारे एक कोटीचे सोन्याचे दागिने पळविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मोहम्मद हनीफ अब्दुल्ला शमा (62), राकेश किर्शनदास लिळानी (50) आणि विक्रांत रंगराज पारेख (38) अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. संबंधित आरोपी ज्वेलर्स व्यापार्यांना कॉल करुन त्यांच्याकडे 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची मागणी करुन त्यामोबदल्यात त्यांना 24 कॅरेटचे सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवत होते. या आमिषाला बळी पडून वांद्रे आणि गिरगाव परिसरात चार व्यापार्यांची फसवणुक झाली होती. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन बोगस सोन्याचे बिस्कीट देऊन ही टोळी पळून गेली होती. अशा प्रकारे चार ज्वेलर्स व्यापार्यांनी बीकेसी आणि व्ही. पी रोड पोलिसांत तक्रार केली होती. या चारही गुन्ह्यांत चारही ज्वेलर्स व्यापार्यांकडील संबंधित टोळीने 1 कोटी 29 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेले होते.
चालू वर्षांत अशा प्रकारच्या तीन गुन्ह्यांची बीकेसी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. त्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त मनिष कनवाहिया, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश चौगुले यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विशाल दौंडकर, पोलीस हवालदार नेताजी गायकवाड, अनुप गायकवाड, प्रदीप चव्हाण, सचिन वाखरे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने राकेश लिळानी, मोहम्मद हनीफ आणि विक्रांत पारेख या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनी या चारही गुन्ह्यांची कबुली दिली. याकामी त्यांना त्यांच्या इतर दोन सहकार्यांनी मदत केली होती. ते तिघेही पूर्वी दलाल म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्या परिचित काही ज्वेलर्स व्यापारी होते. त्यांनाच ते टार्गेट करुन 22 कॅरेटच्या मोबदल्यात 24 कॅरेटचे सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवत होते. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक टोळी असून या तिघांच्या अटकेने अशा प्रकारच्या फसवणुकीच्या चारही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. चौकशीतून आलेल्या माहितीनंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली अहो. या गुन्ह्यांत दोघांचा वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल दौंडकर यांनी सांगितले.