1.86 कोटीच्या दागिन्यांचा अपहार करुन व्यापार्याची फसवणुक
विशाखापट्टणमच्या ज्वेलर्स व्यापार्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 डिसेंबर 2025
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या 1 कोटी 86 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन दोन ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी रणजीत जैन या विशाखापट्टणमच्या व्यापार्याला पायधुनी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्याचा मुलगा शुभम रणजीत जैन याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोन्ही पित्रा-पूत्रांनी अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या रणजीत जैनची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
राकेश ललितकुमार जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत लोअर परेल परिसरात राहतात. मुंबादेवी येथील तांबाकाटा लेन परिसरात त्यांच्या मालकीचे क्लासिक ऑर्नामेंट नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. शहरातील विविध ज्वेलर्स व्यापार्याच्या मागणीप्रमाणे ते सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतात. मुंबईसह देशभरात आयोजित दागिन्यांच्या प्रदर्शनाला ते भाग घेऊन तिथे त्यांच्या कंपनीचे स्टॉल लावत होते. काही वर्षांपूर्वी ते विशाखापट्टणम येथील एका दागिन्यांच्या प्रदर्शनासाठी गेले होते. तिथेच त्यांची रणजीत जैन आणि शुभम जैन या पिता-पूत्रांशी ओळख झाली होती. ते दोघेही ज्वेलर्स व्यापारी होते, त्यांचा विशाखापट्टणम, असीममेट्टा परिसरात संघवी ज्वेलर्स नावाचे एक शॉप होते. या दोघांनी प्रदर्शनात त्यांच्या शॉपमधील काही सोन्याचे दागिने पसंद केले होते. या दागिन्यांची मागणी केल्यानंतर त्यांना ते दागिने पाठविण्यात आले होते.
या दागिन्यांच्या मोबदल्यात त्यांनी रोख स्वरुपात किंवा शुद्ध सोने देऊन पेमेंट केले होते. त्यामुळे या पिता-पूत्रांवर त्यांचा विश्वास बसला होता. एप्रिल ते मे 2025 या कालावधीत त्यांनी रणजीत जैन यांना त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे 1 कोटी 24 लाख 15 हजार 315 रुपयांचे 1381 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने पाठविले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी दागिन्यांचे पेमेंट केले नव्हते. चौकशीदरम्यान त्यांना रणजीत आणि शुभम जैन यांनी त्यांच्यासह त्यांच्या परिचित प्रफुल्ल पन्नालाल राणावत यांच्याकडूनही 67 लाख 78 हजार 146 रुपयांचे विविध सोन्याचे दागिने घेतले होते, मात्र त्यांनाही त्यांनी पेमेंट केले नव्हते.
अशा प्रकारे या दोघांनी राकेश जैन आणि प्रफुल्ल राणावत यांच्याकडून 1 कोटी 86 लाख रुपयांचे दागिने घेऊन या दागिन्यांचे पेमेंट न करता या दोघांच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच या दोघांनी पायधुनी पोलिसांत रणजीत व त्याचा मुलगा शुभम जैन यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही पिता-पूत्राविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पायधुनी पोलिसांची एक टिम विशाखापट्टम येथे गेली होती. या पथकाने रणजीत जैनला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला माझगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.