बोगस सोन्याची लगड देऊन ९९ लाखांच्या दागिन्यांचा अपहार
मध्यप्रदेशातील दोन ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मे २०२४
मुंबई, – सुमारे एक कोटीचे बोगस सोन्याची लगड देऊन क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे ९९ लाखांच्या हिरेजडीत दागिन्यांचा अपहार करुन दोन ज्वेलर्स व्यापार्यांनी एका व्यापार्याची फसवणुक केली. अंकुर विमलकुमार जैन आणि भारतेंदूसिंह सुबोधकुमार मौर्या अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे मध्यप्रदेशचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच मध्यप्रदेशात जाणार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याचे बोलले जाते.
आनंद गिरधरभाई लिंबाचिया ४० वर्षांचे तक्रारदार हिरे व्यापारी असून ते मालाड येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते डिझायर आणि वर्धमान कंपनीकडून डायमंड ज्वेलरी खरेदी करुन त्याची होलसेलमध्ये विक्री करतात. त्यांचे मालाडच्या दफ्तरी रोड, प्रगती शॉपिंग सेंटरमध्ये एक कार्याय आहे. याच कार्यालयातून त्यांचा व्यवहार चालतो. नऊ वर्षांपूर्वी ते ऑपेरा हाऊस येथील पद्मावती डायमंड कंपनीत काम करत होते. यावेळी त्यांची अंकुर जैनशी ओळख झाली होती. अंकुर हा नियमित तिथे हिरेजडीत सोन्याचे दागिने खरेदीसाठी येत होता. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. काही वर्षांनी आनंद लिंबाचिया यांनी ते काम बंद करुन स्वतचा व्यवसाय सुरु केला होता. ही माहिती समजताच अंकुरने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत व्यवहार सुरु केला होता. अनेकदा त्यांनी अंकुरला दागिने दिले होते, त्याचे पेमेंटही त्याने वेळेवर केल्याने त्यांचा अंकुर जैनवर विश्वास बसला होता. २० फेब्रुवारी ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत ग्रँटरोड येथील ऑपेरा हाऊस, श्रीजी प्लाझा कार्यालयात अंकुरसह त्याचा सहकारी भारतेंदूसिंह मौर्या यांनी त्यांच्याकडून सुमारे ९९ लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने घेतले होते. त्यामोबदल्यात त्यांनी त्यांना एक कोटीची ११०९ ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड दिली होती. या सोन्याची लगडची दागिने बनविण्यासाठी वापर करु नये. टप्याटप्याने पेमेंट करुन आपण ती सोन्याची लगड परत घेऊन जाऊ असे त्यांनी त्यांच्याकडे विनंती केली होती.
दिलेल्या मुदतीत त्यांनी दागिन्यांचे पेमेंट केले नाही. त्यामुळे त्यांनी ती सोन्याची लगड तपासणीसाठी पाठविली होती. यावेळी अंकुर आणि भारतेंदूसिंह यांनी दिलेले सर्व सोन्याचे लगड बोगस असल्याचे उघडकीस आले. अशा प्रकारे या दोघांनी बोगस सोन्याची लगड घेऊन त्यांच्याकडून घेतलेल्या सुमारे ९९ लाखांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही मूळचे मध्यप्रदेशचे असल्याने त्यांच्या अटकेसाठी डी. बी मार्ग पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच मध्यप्रदेशाला चौकशीसाठी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.