सोनसाखळीसाठी दिलेल्या ७५ लाखांचा सोन्याचा अपहार
तिघांची फसवणुक केल्याप्रकरणी व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सोनसाखळी बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे ७५ लाखांचा अपहार करुन तीन व्यापार्यांची फसवणुक झाल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सपन चंपानन सामंता या व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या सपनच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरोपी हा तक्रारदाराच्या पत्नीचा चुलत काका असून काळबादेवी परिसरातील एक प्रसिद्ध सोन्याचा व्यापारी म्हणून परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लक्ष्मीकांत राधेश्याम मेट्या हे ज्वेलर्स व्यापारी आहे. ते मूळचे कोलकाताचे रहिवाशी असून काही वर्षांपासून काळबादेवी परिसरात राहतात. त्यांचा काळबादेवी येथील दादीशेठ अग्यारी लेनवर सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना असून मेट्या गोल्ड या नावाने एक शॉप आहे. ते व्यापार्यांना त्यांच्या ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतात. गेल्या काही वर्षांपासून व्यवसाय करत असल्याने त्यांचे परिसरातील अनेक व्यापार्यांशी चांगले संबंध होते. सपन सामंता हा त्यांच्या पत्नीचा चुलत काका आहे. त्याचा सोनसाखळी बनविण्याचा व्यवसाय असून मार्केटमध्ये तोदेखील चांगला व्यापारी म्हणून परिचित आहे. त्याचाही काळबादेवी परिसरात एक कारखाना आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने त्याला वेगवेगळ्या डिझाईनचे सोनसाखळी बनविण्यासाठी दिले होते. जुलै २०२४ रोजी त्यांनी सपनला ५० लाख ७० हजार रुपयांचे ६९० ग्रॅम वजनाचे ९९५ शुद्ध सोन्याचा बार सोनसाखळी बनविण्यासाठी दिले होते. पंधरा दिवसांत त्याने सोनसाखळी बनवून देण्याचे आश्वसन दिले होते. मात्र पंधरा दिवसानंतर त्याने सोनसाखळी बनवून दिले नाही. त्यामुळे ते त्याच्या कारखान्यात गेले होते. यावेळी त्यांना २२ जुलैपासून सपन हा कारखाना बंद करुन निघून गेल्याचे दिसून आले. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे त्यांनी सपनविषयी मार्केटमध्ये चौकशी सुरु केली होती.
यावेळी त्यांना सपनने त्यांच्यासह कांदिवलीतील चारकोपचे स्वर्नकांती नंदलाल पंजा यांच्याकडून ५ जुलै आणि १० जुलैला अनुक्रमे १८ लाख रुपयांचे २५२ ग्रॅम वजनाचे तर विमल राखल पंजा यांच्याकडून सात लाख रुपयांचे शंभर ग्रॅम सोने घेतले होते. मात्र त्याने त्यांनाही सोनसाखळी बनवून दिले नव्हते. अशा प्रकारे त्याने लक्ष्मीकांत मेट्या यांच्यासह इतर दोन व्यापार्यांकडून ७५ लाख ७० हजार रुपयांचे १०४२ ग्रॅम वजनाचे सोने सोनसाखळी बनविण्यासाठी घेतले, मात्र सोनसाखळी न देता सोन्याचा अपहार करुन या तिघांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच या तिघांनी एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सपन सामंता याच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याचा अपहार करुन तीन व्यापार्यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या सपनचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. सपन हा मूळचा कोलकाताचा रहिवाशी आहे. फसवणुकीनंतर तो कोलकाता येथे पळून जाण्याची शक्यता असल्याने एक टिम लवकरच तिथे पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.