स्वस्तात सोने देण्याची बतावणी करुन वकिलाची फसवणुक

सव्वापाच लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – स्वस्तात सोने देण्याची बतावणी करुन एका वकिलाची सुमारे सव्वापाच लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रमेश पटेल, राहुल व अन्य एका आरोपीविरुद्ध दहिसर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे.

३१ वर्षांचे तक्रारदार वकिल असून सांताक्रुज येथे राहतात. ते मुंबई उच्च न्यायालयात प्रक्टीस करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना सोशल साईटवर रमेश पटेल या ज्वेलर्स व्यापार्‍याची प्रोफाईल दिसली. तो स्वस्तात सोने विक्री करत असल्याचा दावा करत होता. त्यामुळे त्यांनी त्याला संपर्क साधला होता. यावेळी रमेशने त्यांना ७ लाख २० हजार रुपयांचे शंभर ग्रॅम सोने ५ लाख २० लाखांमध्ये देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे ते सोने खरेदीसाठी तयार झाले होते. त्याने त्यांना दहिसर येथे बोलावून राहुल हा त्यांना सोने देईल, त्याच्याकडे पेमेंट करण्याची विनंती केली होती. ठरल्याप्रमाणे १८ सप्टेंबरला सायंकाळी ते दहिसर मेट्रो स्टेशनजवळ आले होते. यावेळी तिथे राहुलसह अन्य एक तरुण आला. त्यांनी त्यांच्याकडून ५ लाख २० हजार रुपये घेतले आणि त्यांना शंभर ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे बिस्कीट दिले होते. सोन्याच्या शुद्धतेची खात्री करण्यासाठी ते राहुलसोबत तनिष्क ज्वेलर्समध्ये जाण्यासाठी निघाले.

मात्र काही अंतर गेल्यानंतर राहुल हा त्याच्या दुसर्‍या सहकार्‍यासोबत बाईकवरुन पळून गेला. त्यांनी त्याच्यासह रमेश पटेलला संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तनिष्क ज्वेलर्समध्ये जाऊन त्यांनी सोन्याची पडताळणी केली असता ते बिस्कीट पितळ असून ५६ ग्रॅम वजनाचे असल्याचे उघडकीस आले. स्वस्तात सोने देण्याची बतावणी करुन या तिघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page