सव्वाकोटीच्या पेमेंटचा अपहार करुन व्यापार्याची फसवणुक
सोन्याचे दागिने घेऊन पळून गेलेल्या व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे सव्वाकोटी रुपयांच्या सोन्याच्या विविध दागिन्यांचे पेमेंटचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रमसिंह रामसिंह राव या व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विक्रमसिंह हा सुमारे सव्वाकोटीचे दागिने घेऊन पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
भुपेंद्रसिंह शंभूसिंह राव हे ज्वेलर्स व्यापारी असून नवी मुंबईतील कामोठे-पनवेल परिसरात राहतात. त्यांचा झव्हेरी बाजार येथील शेखमेमन स्ट्रिट, भेरुमल हाऊसमध्ये सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. विक्रमसिंह राव हे त्यांच्या परिचित ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा आर्थिक व्यवहार होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. १७ जून ते २८ जून २०२४ या कालावधीत विक्रमसिंहने त्यांच्याकडून क्रेडिटवर सव्वादोन किलो वजनाचे विविध सोन्याचे दागिने विक्रीसाठी घेतले होते. त्यापैकी त्याने ५२९ ग्रॅम वजनाचे दागिने पेमेंट केले होते. मात्र उर्वरित सव्वाकोटीच्या १७३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पेमेंट केले नाही किंवा ते दागिने त्यांना परत केले नव्हते. वारंवार विचारणा करुनही त्यांना त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. विक्रमसिंह हा दागिने घेऊन पळून गेल्याची खात्री होताच भुपेंद्रसिंह राव यांनी विक्रमसिंह याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. विक्रमसिंह हा पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. विक्रमसिंहने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.