सोन्याचे दागिन्यांची परस्पर व्यापार्यांना विक्री करुन फसवणुक
४६ लाखांच्या दागिन्यांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोन्याच्या दागिन्यांची परस्पर विक्री करुन स्वतच्या मालकाची सुमारे ४६ लाखांची फसवणुक करुन दोन कारागिराने कारखान्यातून पलायन केल्याची घटना पायधुनी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्यामसुंदर आणि रास महांतो या दोन्ही आरोपी कारागिरांविरुद्ध पायधुनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या दोघांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
बिजोय मदन जाना हे वडाळा येथील न्यू कफ परेड परिसरात राहत असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. पायधुनीतील अब्दुल रेहमान स्ट्रिट, वल्लभ निवासमध्ये त्यांचा कारखाना असून तिथेच श्यामसुंदर आणि रास महांतो हे दोघेही कारागिर म्हणून काम करत होते. अलीकडेच त्यांनी त्यांना १८४७ ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. त्यानंतर त्यांनी काही दागिने बनवून त्यांना परत केले होते. मात्र त्यातील ४६ लाख ५० हजार रुपयांचे ६८५ ग्रॅम वजनाचे त्यांनी त्यांना दागिने दिले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. यावेळी श्यामसुंदर आणि रास महांतो यांनी त्यांना दिलेल्या सोन्यांच्या दागिन्यांमध्ये अफरातफर केली होती. ६८५ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची परस्पर इतर व्यापार्यांना विक्री करुन या दोघांनी त्यांची ४६ लाख ५० हजाराची फसवणुक करुन कारखान्यातून पलायन केले होते.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी दोन्ही कारागिराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी श्यामसुंदर आणि रास महांतो यांच्याविरुद्ध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन त्यांच्याच मालकाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.