२५ लाखांच्या दागिन्यांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
क्रेडिटवर घेतलेल्या दागिन्यांची विक्री करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सुमारे २५ लाख रुपयांच्या दागिन्यांच्या अपहारप्रकरणी दिनेश रावत या ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. क्रेडिटवर घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा परस्पर विक्री करुन त्याने एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याचा आरोप आहे. त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच अहमदाबादला जाणारआहे.
पियुष अशोक जैन हे मालाड परिसरात राहत असून व्यवसायाने ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा धनजी स्ट्रिट परिसरात अंबिका ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. दिनेश रावत हा त्यांच्या परिचित ज्वेलर्स व्यापारी असून तो मूळचा अहमदाबादचा रहिवाशी आहे. त्याचा तिथेच सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. सप्टेंबर २०१८ रोजी त्यांनी त्यांच्याकडून सुमारे २५ लाख रुपयांचे ३८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने क्रेडिटवर विक्रीसाठी घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दागिने परत केले नाही किंवा दागिन्यांचे पेमेंट केले नव्हते. गेल्या सहा वर्षांपासून ते त्याच्याकडे विचारणा करत होता. मात्र तो त्यांना सतत विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. दिनेश रावतने विक्रीसाठी घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा परस्पर दुसर्या ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री करुन सुमारे २५ लाखांचा अपहार केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अलीकडेच दिनेशविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याच्या अटकेसाठी एल. टी मार्ग पोलिसांची एक टिम लवकरच अहमदाबादला जाणार आहे.